नांदेड – ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाने नटलेलं एक शहर. तख्त सचखंड श्री हुजूर साहिब सारखा जागतिक कीर्तीचा गुरूद्वारा, गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे शहर, आज मात्र वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे.अपुऱ्या नागरी सुविधा, वाढता गुन्हेगारीचा आलेख, आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर होणारा दुजाभाव.
*अपूर्ण विकासाचं वास्तव*
शहरात विकासाच्या गाजावाजात कोट्यवधी रुपयांचा निधी येतो. मात्र प्रत्यक्षात रस्ते खड्ड्यांनी भरलेले, अपघात ही रोजची बाब, वाहतुकीचा ताण, आणि लाईट सारखी मुलभूत सेवा वारंवार खंडित हे सर्व नांदेडच्या वास्तवाची जळजळीत साक्ष देतात.
“आज रस्ता बनतो, उद्या तोच पुन्हा खोदला जातो” – ही परिस्थिती केवळ नागरिकांचा संयम कसाला लावणारी नाही, तर निधीचा वापर कसा होत आहे, यावर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे. पार्किंग,सुलभ शौचालय चा अभाव, वाहतूक व्यवस्था विस्कळीत
*सामाजिक अस्वस्थता आणि वाढती आत्महत्या*
नांदेडमधील पुलांवरून होणाऱ्या आत्महत्या काही अपवादात्मक घटना राहिलेल्या नाहीत. या प्रकारचं सातत्य हे सामाजिक असंतुलनाचं आणि मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षिततेचं चिंताजनक उदाहरण आहे. त्यातच शहरात खुलेआम चालणारा नशेचा व्यवसाय, आणि तरुण पिढीचं त्यात अडकणं – या सगळ्यांनी नांदेडच्या भविष्याला काळोखाच्या कडेला नेऊन ठेवलं आहे.
*आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा – केवळ नावापुरत्याच?*
शासकीय रुग्णालयां शहरापासून दूर नांदेड शहरातील श्री गुरु गोबिंद सिंघ जी रूग्णालय फक्त नावाला, रुग्णालयात मध्ये वेळेवर उपचार मिळत नाहीत, औषधांचा तुटवडा असतो, आवश्यक मशिनरी अपुरी जी आहे ती बहुतांश बंद आणि सेवाभावाची कमतरता प्रकर्षाने जाणवते. शिक्षण संस्थांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा नाहीत, आणि खेळाच्या मैदानांचं ओस पडणं ही चिंतेची बाब आहे. शहराच्या क्षेत्रफळा च्या हीशेबाने उद्द्याने अपुरी.
गुरूद्वारा व्यवस्थापनात स्थानिक शिख समाज उपेक्षित व अन्यायग्रस्त
नांदेडच्या गुरूद्वारा बोर्ड संदर्भात एक गंभीर बाब म्हणजे गेल्या पंचवीस वर्षांपासून महाराष्ट्र सरकारचा सरळ हस्तक्षेप, आणि स्थानिक शिख समाजाची सततची उपेक्षा. स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून बाहेरच्या शहरातून नियुक्त केले जाणारे प्रबंधक हे केवळ धार्मिक नाही, तर लोकशाही मूल्यांवरही आघात आहे.
शिख समाजाच्या वतीने वेळोवेळी सरकारला निवेदने, आंदोलनं, आणि लोकप्रतिनिधींपर्यंत मागण्या पोहोचवण्यात आल्या. मात्र अद्यापही त्यांच्या भावनांना न्याय मिळालेला नाही. ही गोष्ट आजच्या समाज व्यवस्थेतील अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा मोठा मुद्दा बनू शकतो.
*निष्क्रियता आणि नागरिकांची तडफड*
नेते येतात, आश्वासनं देतात, फोटो व व्हिडिओ काढून जातात. माध्यमं आवाज उठवतात, पत्रकार प्रश्न विचारतात, पण निर्णय घेणाऱ्यांच्या मनात काहीच हलत नाही. कारण त्यांना माहीत आहे, नांदेडचा माणूस सगळं गप्पच सहन करतो.
मात्र ही शांतता झोपेतली नाही . ही तडफड आहे. आणि तडफड जेव्हा ज्वालामुखी बनते, तेव्हा ती व्यवस्थेलाही हादरवून सोडते.
शहराचा विकास केवळ,गोड गोड बोलण्याने व कामाच्या देखाव्याचा गाजा वाजा केल्याने होत नाही, तो नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्याने होतो.
नांदेडसारख्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक शहराला केवळ सौंदर्य नव्हे, तर न्याय, पारदर्शकता आणि नागरिक-सन्मानाची गरज आहे.
–राजेंद्र सिंघ नौनिहाल सिंघ शाहू
(इलेक्ट्रिकल ट्रेनर, नांदेड)
मो.: 7700063999
