संघ-भाजप नात्याचा स्फोट: ‘कचऱ्यात टाकणार का?’ हा सवाल की बंडखोरीची सुरूवात?
भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील संबंध सर्वज्ञात आहेत. या दोन्ही संस्था एकमेकींशी किती घट्टपणे जोडलेल्या आहेत, याविषयी सतत चर्चा होत असते. संघ आणि भाजप यांच्यात “आई कोण?”, “वडील कोण?”, “मोठा भाऊ कोण?”, “लहान भाऊ कोण?” अशा स्वरूपाच्या उपमा वापरून चर्चेला रंग दिला जातो.
काही दिवसांपूर्वी संघप्रमुख मोहनजी भागवत यांनी वक्तव्य केलं की, “७५ वर्षे पूर्ण झाली म्हणजे आता शाल देऊन सन्मान केल्यानंतर बाजूला व्हायचं, म्हणजे विचारांना संधी द्यायची.” हे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आहे, असा अनेकांचा समज झाला, आणि त्यामुळे चर्चेला उधाण आलं.2014 पूर्वी संघ ही भाजपसाठी केवळ एक मार्गदर्शक संस्था होती. परंतु 2014 नंतर परिस्थिती बदलत गेली. भाजपमधील कुणीही नेते संघाविरुद्ध जाहीरपणे काही बोलतील, ही कल्पनाही अशक्य होती. परंतु आता सूर बदलले आहेत.पत्रकार अशोक वानखेडे आणि आशिष चित्राशी यांनी असा अंदाज व्यक्त केला होता की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे मिळून भाजपमध्ये संघाविरुद्ध विद्रोहाची परिस्थिती निर्माण करतील. इतकेच नव्हे तर, ते संघाचे दोन गटही करतील, असेही त्यांनी म्हटले होते.
मध्यप्रदेशमधील मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष रामकृष्ण कुसमारिया यांनी अलीकडेच एक वक्तव्य करत म्हटलं की, “वयस्कर झालो म्हणून आम्हाला कचऱ्याच्या डब्यात टाकणार काय?” हे वक्तव्य मोहन भागवत यांच्या वयावर केलेल्या विधानाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट झाले आहे.कुसमारिया यांनी असेही म्हटले की, “आईवडिलांना वय झालं म्हणून कचऱ्यात फेकायचं का?” त्यांच्या मते, अनुभवी लोकांचं मार्गदर्शन अधिक उपयुक्त ठरतं.लोकसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशात अनेक भाजप नेत्यांनी सन्मानाची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यांना अपेक्षित सन्मान मिळाला नाही. त्या वेळी कुसमारिया शांत होते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी, नजमा हेपतुल्ला, सुमित्रा महाजन यांना 75 वर्ष पूर्ण झाल्यावर पक्षातून दूर करण्यात आलं, यावरही ते काही बोलले नव्हते.
रामकृष्ण कुसमारिया हे मोहन यादव यांच्या सरकारचा भाग आहेत. त्यामुळे त्यांचे विधान ‘स्क्रिप्टेड’ असल्याचा आरोप वानखेडे करतात. यावरून स्पष्ट होतं की, संघातही अंतर्गत मतभेद आहेत आणि त्यांचं स्वरूप गंभीर आहे.मोहन भागवत यांनी काही महिन्यांपूर्वी “प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका” असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर ट्रोलिंग करण्यात आले होते. हे ट्रोल कोण करतं, हेही सर्वश्रुत आहे.रामकृष्ण कुसमारिया यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. ते चार वेळा आमदार, पाच वेळा खासदार राहिले आहेत. आजही ते मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत. वानखेडे यांच्या मते, सुरेश सोनी यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना ही पदं मिळाली आहेत.
2012 मध्ये नितीन गडकरी यांच्यावर जेव्हा चौकशी सुरू झाली, तेव्हा सुरेश सोनी यांनीच त्यांना अध्यक्षपदासाठी बाजूला होण्याचा सल्ला दिला होता. मात्र आजही अनेक आरोपग्रस्त नेते मंत्रिपद भूषवत आहेत, हे विसरून चालणार नाही.प्रश्न असा आहे की, वय झाले म्हणून राजकीय जीवन संपवावं का? की तो निर्णय व्यक्तीने स्वतः घ्यावा? मोहन भागवत यांचं विधान याच मुद्याभोवती फिरतं. पण कुसमारिया यांचं उत्तर थेट विरोधात जाणारं आहे आणि हे योजूनच केलं गेलं असल्याचा संशय निर्माण होतो.आज रामकृष्ण कुसमारिया बोलले आहेत. उद्या इतरही बोलतील. आणि ही वक्तव्यं अधिक कठोर, रोखठोक व कडवट होतील, यात शंका नाही.कुसमारिया यांनी एकदा तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली होती. निवडणूक हरले. त्यावेळी त्यांनी भाजपवर “औरंगजेबांसारखे प्रशासन” असल्याची टीका केली होती.
आज ते म्हणतात की, “मी कचरा आहे का?” – तर त्यांनी हे दाखवावं की त्यांनी पक्षासाठी काय योगदान दिलं आहे. राजकीय फायद्यासाठी पक्षात येणं, नंतर बाहेर पडणं, पुन्हा तिकीट मिळालं की परत येणं – हेच जर जीवन असेल, तर प्रश्न विचारायलाच हवा.मध्यप्रदेशात ‘नारायण टॅक्स’ नावाचा एक नवाच प्रकार सुरू असल्याचीही चर्चा आहे . जमीन घ्या, इमारती उभ्या करा, पण त्यासाठी ‘नारायण टॅक्स’ भरावा लागतो, असं लोक म्हणतात. याचा अर्थ वाचकांनी लावावा.संपूर्ण घडामोडी पाहता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरहून दिल्लीवर दबाव टाकत आहे, तर मध्यप्रदेशातून संघावरच दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा खेळात मुख्यमंत्री मोहन यादव फसले असल्याचंही चित्र आहे.
