लोक म्हणतात, “पोलीस खातं जे करेल, तेच होईल.” हे वाक्य कधीकधी नकारात्मक अर्थाने घेतले जाते. मात्र, आम्ही आज हेच वाक्य एका सकारात्मक अर्थाने मांडत आहोत.वजीराबाद पोलिसांनी एका अनोळखी मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी पाठवले, तसेच तिच्या तीन वर्षांच्या मुलीला आणि सात महिन्याच्या बालकाला नांदेड येथील शिशुगृहात सुरक्षित ठेवले. त्या महिलेस तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचवून अखेर त्या दोन बालकांना तिच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.
ही घटना वजीराबाद पोलिसांची आहे. पोलिसांनी ठरवलं, तर ते काहीही करू शकतात, हे या प्रसंगातून पुन्हा सिद्ध झाले आहे. चांगल्या कार्याची प्रशंसा केली नाही, तर आंही आपल्या लेखणीशीच बेईमानी करतो, असं म्हणावं लागेल.या प्रकरणाचा घटनाक्रम असा आहे:राखी पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजेच दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी, दुपारी वजिराबाद पोलिसांना माहिती मिळाली की डॉक्टर्स लेन परिसरात उमरेकर हॉस्पिटल समोर एक 25 ते 30 वर्षांची अनोळखी महिला जोरजोरात ओरडत आहे आणि तिच्यासोबत असलेल्या 6 ते 7 महिन्यांच्या बाळाला मारहाण करत आहे.
त्यानंतर पोलीस अंमलदार शरद सोनटक्के त्वरित घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या महिलेला महिला पोलीस आमदारांच्या मदतीने ताब्यात घेतले. बाळाच्या सुरक्षिततेसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधून, दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आणि बाल कल्याण समितीसमोर हजर केले.बाल कल्याण समितीने त्या बाळाला लोहा येथील सावित्रीबाई फुले शिशुगृहात पाठवले. त्यानंतर संबंधित महिलेच्या मानसिक स्थितीचा आढावा घेण्यात आला. नांदेडच्या शासकीय रुग्णालयाने तिच्या पुढील उपचारासाठी तिला प्रादेशिक मनोरुग्णालय, येरवडा (पुणे) येथे पाठवण्याचा अभिप्राय दिला.
दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार, तिला येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर तब्बल 11 महिने उपचार सुरु होते. दरम्यान, तिच्या नातलगांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत राहिले.अखेर अथक प्रयत्नांनंतर तिचे नाव मंटादेवी बिरबल महत्व (राहिवासी – चंपारण जिल्हा, बिहार) असे असल्याचे निष्पन्न झाले. प्रादेशिक मनोरुग्णालयाशी संलग्न NGO च्या मदतीने तिच्या नातलगांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या माहितीवरून, ती महिला चंपारण जिल्ह्यातील मलाई टोला गावाची असल्याचे समजले.
पोलीस आणि NGO यांच्या माध्यमातून तिच्या पती बिरबल महतो यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी रुग्णालयात भेट दिली आणि महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तिला घेऊन नांदेड येथे परतले.दरम्यान, तिची दुसरी मुलगी देखील वजीराबाद येथील रेल्वे स्थानक परिसरातून सापडली होती. ती राहुल कांबळे (पोलीस आमदार) यांनी 19 ऑगस्ट रोजीच ताब्यात घेतली. बालकल्याण समितीच्या आदेशानुसार, तिला नरसाबाई महिला मंडळ, वडगाव यांच्याद्वारे संचालित शिशुगृह गीता नगर येथे ठेवण्यात आले होते. नंतर तपासात ही मुलगी देखील त्या महिलेसोबतच असल्याचे निष्पन्न झाले.दोन्ही मुलांना त्यांच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. दिनांक 10 जुलै रोजी, रेल्वेने संपूर्ण कुटुंबाला बिहारकडे रवाना करण्यात आले.
पोलीस विभागाचे हे काम आहे काय? या प्रकरणातून स्पष्ट होते. की आवळे काम नसतांना सुद्धा वजिराबाद पोलिसांनी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या नेतुत्वात या अनोळखी मनोरुग्ण महिलेला उपचार मिळवून देणे, तिच्या दोन मुलांचा कायदेशीररित्या सांभाळ केला, आणि अखेर या दुरावलेल्या कुटुंबाला एकत्र आणणे हे सर्व कार्य वजीराबाद पोलिसांनी अतिशय जबाबदारीने आणि मनापासून पार पाडले.या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा पोलीस महा निरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस उप अधीक्षक सुशीलकुमार नायक यांनी केली आहे.
