*सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना अर्ज करण्याचे आवाहन*
नांदेड- रोजगार व स्वयंरोजगारासाठी राबविण्यात येणारी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना नवीन व्यवसाय सुरू करावयाचा आहे त्यांनी https/maha_cmegp.gov.in या वेबसाईटवर अर्ज करावा किंवा योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र उद्योग भवन पहिला मजला शिवाजीनगर नांदेड येथे कार्यालयीन कामाच्या दिवशी प्रत्यक्ष भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातीत शहरी व ग्रामीण सुशिक्षित युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध ठिकाणी उपलब्ध होत असलेला स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देणारी सर्व समावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने सुरू केला आहे. ही महत्वाकांक्षी योजना जिल्ह्यात जिल्हा उद्योग केंद्र व खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालयामार्फत राबविण्यात येते. ही योजना पूर्णत: ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येते. नवीन उपक्रम सुरु करण्यासाठी बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या कर्जास संलग्न अनुदान योजना आहे. ही योजना कायदेशिररित्या पात्र असणारे उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी आहे.
*योजनेचे निकष*
योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झाले आहे. पात्र व्यवसायातंर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषीपुरक उद्योग व्यवसायासाठी 50 लाख व उत्पादन उद्योग प्रकल्पासाठी एक कोटी राहील. तसेच घटकाच्या प्रवर्गानुसार अनुदान देय राहील. शैक्षणिक पात्रता : 10 लाखावरील उत्पादन प्रवर्गातील व 5 लाखावरील सेवा व कृषी पूरक व्यवसाय प्रकल्पासाठी अर्जदार किमान 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाच्या कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा (कोणत्याही योजनेत अनुदान घेतलेले नसावे). ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यासाठी लागणारे विहीत कागदपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र, ग्रामीण भागाकरिता लोकसंख्येचा दाखला व इतर व्यवसायानुषंगिक कागदपत्रे आवश्यक आहेत.
या योजनेतंर्गत अर्ज करण्यासाठी https/maha_cmegp.gov.in हे संकेतस्थळ आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केली नाही. या योजनेचा लाभ घेण्यास खाजगी व्यक्तीकडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त अर्जदारांनी या योजनेचा भाग घ्यावा, असेही आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02462-299088 असून ई-मेल आयडी didic.nanded@maharashtra.gov.in असा आहे.
