मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात ‘अनुभूती’ राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन, महिलांच्या आर्थिक समावेशनातील भूमिकेवर भर

मिरामार: –ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि गोवा राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (GSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अनुभूती’ या आर्थिक समावेशनावरील राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यात संपन्न झाले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात संपूर्ण भारतातून अधिकारी आणि ग्रामीण विकास तज्ज्ञ एकत्र येऊन महिला नेतृत्वाखालील आर्थिक समावेशन व स्थानिक सशक्तीकरणावर विचारमंथन करत आहेत.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे कौतुक करताना पीएम गरीब कल्याण योजना, उज्ज्वला, नळ से जल, स्वच्छ भारत मिशन, पीएम आवास योजना, मुद्रा व स्वनिधी अशा परिवर्तनशील योजनांमुळे महिलांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाचं नवं युग सुरु झालं असल्याचे सांगितले. ‘३ कोटी लक्षपती दीदी’ निर्माण करण्याचे अभियान ग्रामीण महिलांना उद्योजक व निर्णयकर्त्या बनवित असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

गोव्याच्या योगदानावर प्रकाश टाकताना डॉ. सावंत म्हणाले की, राज्यात ३,२५० हून अधिक स्वयं-सहायता गट असून ते ४८,००० पेक्षा जास्त महिलांपर्यंत पोहोचले आहेत. ₹३,६५३ कोटींच्या क्रेडिट लिंकिंगसह, ४१,६०० महिला जनधन योजनेशी जोडल्या गेल्या आहेत, ५४० विमा सखी प्रशिक्षित करण्यात आल्या आहेत, आणि ३६ स्वयं-सहायता गटांमार्फत CSC केंद्रे चालवली जात आहेत. महिलांचा सहभाग केवळ दर्शनी नसून त्या स्थानिक विकासाच्या प्रमुख भूमिका निभावत आहेत. ९९% पेक्षा जास्त कर्ज वसुली दर हे बँकांबरोबर निर्माण झालेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व गटांना क्रेडिट लिंक केल्यास गोव्यात ₹९०० कोटींहून अधिकचे फिरते भांडवल निर्माण होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, ‘स्वयंपूर्ण गोवा’ या मिशनच्या माध्यमातून सर्वसमावेशक प्रशासनाची दिशा स्पष्ट होत असून, प्रत्येक घरापर्यंत विकास पोहोचवून आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि संधी मिळवून देणे हे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

 

या उद्घाटन सत्रास  खासदार (राज्यसभा) सदानंद शेट तानावडे, ग्रामीण विकास सचिव संजय गोयल (IAS), भारत सरकारचे संयुक्त सचिव श्रीमती स्मृती शरण, उपसचिव डॉ. मोनिका आणि देशभरातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!