नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील जनतेच्या सोयीसाठी अनेक ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या चौक्यामध्ये पोलीस स्टेशनला जाण्याअगोदरच येथे हजर असलेले पोलीस अंमलदार अनेकदा जनतेला मदत करतात आणि त्यातून बऱ्याच समस्या मोठ्या होण्यापासून वाचतात. परंतू पोलीस ठाणे शिवाजीनगर अंतर्गत डॉ.अण्णाभाऊ साठे चौकात असलेल्या पोलीस चौकीची दुरावस्था पाहिली तर त्या ठिकाणी पोलीस कसे थांबतील आणि पोलीस कसे जनतेला मदत करतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जनतेला जवळच पोलीसांची मदत मिळावी म्हणून 1998 मध्ये माजी पोलीस अधिक्षक तथा सेवानिवृत्त अपर पोलीस महासंचालक व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी पोलीस चौक्यांची संकल्पना तयार केली. त्यांनी पोलीसांना अशा सुचना दिल्या होत्या की, पोलीस चौकीपासून पोलीस ठाण्यात जाईपर्यंत जनतेला होणारा त्रास बराचसा तुमच्यामुळे कमी होईल. त्यामुळे पोलीस त्या काळात तर अत्यंत दिमतीने ते काम करत होते.
पुढे पोलीस अधिक्षक बदलत गेले आणि जनतेची आपले संबंध सुधारण्याच्या नादात पोलीस चौक्यांमध्ये वाढ करण्यात आली. काही अंशी नक्कीच या चौक्यामुळे जनतेला मदत मिळत गेली. त्या भागात असलेली गुंड मंडळी, भाईगिरी करणारे लोक, पोलीस येथे असतात म्हणून घाबरत होते. परंतू त्या चौक्यांमध्ये सुध्दा वेगवेगळे प्रकार सुरू झाले.
आजच्या अवस्थेतील पोलीस ठाणे शिवाजीनगर यांच्या हद्दीत असलेली डॉ.अण्णाभाऊ साठे चौकातील पोलीस चौकी महावितरण कार्यालयाच्या भिंतीला लागून उभारण्यात आली आहे. ज्या भागात ही चौकी आहे. त्या भागात सुध्दा भाईगिरीचा कारभार मोठ्या प्रमाणात सुरू असतो. परंतू या चौकीचा व्हिडीओ काढला तेंव्हा त्या काही पेट्या दिसतात. सोबतच बसण्यास खुर्ची नाही. खिडकीची तावदाने तुटलेली आहेत. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर या चौकीत विज उपलब्ध नाही. मग पोलीस त्यात कसे बसतील. कागदोपत्री डॉ.अण्णाभाऊ साठे चौक पोलीस चौकी असा वापर केला जातो. परंतू त्यात बसायलाच जागा नाही, भौतिक सुविधा नाहीत तर पोलीस कसे थांबतील आणि कशी जनतेची सेवा करतील या प्रश्नाचे उत्तर कोणाला विचारावे आणि कोण देणार याचे उत्तर म्हणून आम्ही हा प्रश्न वाचकांसमोरच उपस्थित केला.
संबंधीत पोलीस चौकीचा व्हिडीओ…
