चौफेर मराठी वाचन, बोलण्याचे चातुर्य, हजर जबाबीपणा, प्रगत व पुरोगामी विचार असलेले प्रसन्न जोशी एक गुणी टीव्ही अँकर आहेत. मराठा समाजाने लग्नाबद्दल जाहीर केलेल्या आचारसंहितेबद्दल एका चर्चासत्रासाठी त्यांनी मला एबीपी माझावर निमंत्रित केले होते. मी समाज शास्त्राचा विद्यार्थी या दृष्टीने या चर्चेकडे पाहत आहे असे म्हणत मी बोलायला सुरुवात केली . माझे म्हणणे पूर्ण ऐकून न घेता माझा या विषयातील अभ्यास नाही, माझ्या मांडणीमुळे जातीय तणाव वाढेल असे म्हणत त्यांनी भर चर्चेत माझा आवाज बंद केला! चर्चेला बोलावून आवाज बंद करण्याची एवढी ताकद एबीपी माझा व प्रसन्ना जोशी यांच्यामध्ये कशी आणि कोठून आली?
मोठा हुंडा मागणे, व्हीआयपी सह अनेक लोकांना बोलविणे, मोठ्या जेवणा वळी, डीजे वाजवत घोड्यावरून मिरवणूक काढणे,…, या सारखे कार्यक्रम आयोजित करण्याचे वर्तन मराठा सह बहुजन समाज लग्न कार्यक्रमात करतात. वर्तन शास्त्रानुसार (behavioural science) मी याकडे पाहत असता असे आढळले की आपला आत्मसन्मान (self esteem)खूप कमी दर्जाचा आहे असे त्यांना कायम वाटत राहते. त्यांचा आत्मसन्मान कमी करणाऱ्या बाबी सतत नकळत बहुजनांच्या अबोध मनात नोंदत राहतात. आत्मसन्मान उंचावण्यासाठी ते असे वर्तन करत असतात. हा आत्मसन्मान लग्नातच कमी करण्याचा प्रयत्न कसा होतो याबद्दल मी टीव्ही चर्चेत पुढील मुद्दे मांडायला सुरवात केली होती.
* बहुजनांच्या लग्नविधी अगोदर नवरा-नवरी अगर वरमाई, वरपिता किंवा मामा, मामी यांना समोर बसवून ब्राह्मण संस्कृत मध्ये किडमीड बोलत असतो. त्यात ‘राक्षस गण’ असा शब्द उच्चारला जातो. तो क्षत्रिया साठी असतो. पूजा घालणारा ब्राह्मण हा सत्वगुणी असल्याने स्वतःला भूतलावरील देव समजतो तर क्षत्रियांना रजो गुणी राक्षस समजतो. चक्क राक्षस! माणूस सुद्धा समजत नाही आम्हाला. आणि अशी बेइज्जती केली तरी आम्ही त्याला गले लठ्ठ दक्षिना आणि कोरडा शिधा देतो.
*पूजेच्या वेळी भटजी अनेक गोष्टी समर्पित करायला सांगतो. त्यात एक वाक्य ऐकायला मिळते.
” मम भार्या समर्पयामी (समरपयामी)!” याचा अर्थ काय? कोणी कोणाला आपली भार्या/ पत्नी समर्पित करावी? नवरदेवाने ब्राह्मणाला की ब्राह्मणाने नवरदेवाला?
*बहुजनांच्या लग्नात गोत्र सांगितले जाते. माझे गोत्र कश्यप सांगितले होते. क्षत्रिय मराठ्यांच्या घरात हा ब्राह्मण ऋषी कसा? परशुरामाने 21 वेळा सर्व क्षत्रियांचा नाश केला. त्यांच्या विधवांशी बळजबरीने संभोग करून जी पिढी निर्माण केली त्या पिढीला त्या ब्राह्मणाचे/ऋषीमुनीचे नाव दिले. खोपडे घराण्याला कश्यप ऋषी आला. अलीकडे मला गुपित समजल्यावर कश्यप ऋषीचा कणकीचा पुतळा तयार केला आणि उकिरंड्या मध्ये जिवंत गाडला.
* हे सांगत असता प्रसन्न जोशी यांनी मधेच हस्तक्षेप केला. या वक्तव्यामुळे बहुजन आणि ब्राह्मण या दोन समाजामध्ये तणाव निर्माण होईल. शिवाय माझा या विषयातील अभ्यास नाही असे जाहीर करून मला सूचना न देता चॅनलवरील माझा आवाज खंडित केला व नंतर बोलू दिले नाही!
* माझा त्या विषयातील अभ्यास नाही हे ठरवण्याचा अधिकार या जोशींना कोणी दिला? जोशींचे ज्ञान काय?अनुभव काय?
*दक्षिणा वसूल करण्यासाठी आवश्यक असलेले मंत्र आणि श्लोक पाठ नसले तरी जोशी पेक्षा मी भगवद्गीता, मनुस्मृती सखोल अभ्यासलेली आहे. वाचन करून वेदांचा मूळ आशय समजून घेतलेला आहे.हे सगळे ग्रंथ माझ्या संग्रही आहेत.
* हे सगळे मानसशास्त्रावर आधारित प्रश्न उपस्थित केलेले होते. मी उपस्थित केलेला एकही मुद्दा खोटा आहे असे सिद्ध न करता त्यांनी माझ्या मुद्द्यामुळे जातीय तणाव वाढत आहे असे म्हणत माझा चैनल वरील आवाज बंद केला.
* माझ्या तुलनेत जोशी यांचा मराठा सह बहुजन समाजातील या वृत्ती बद्दल किती अभ्यास आहे? काहीच नाही?
मी एका खेडेगावात जन्मलो, वाढलो ,मला खेडे माहीत आहे. मी दारिद्र्य पाहिले अनुभवले. मी स्वतः शेती पदवीधर आहे. पोलीस दलामध्ये जाण्या अगोदर मी जेलमध्ये गेलो होतो. एक विद्यार्थी परिवर्तनवादी चळवळी कार्यकर्ता म्हणून.
35 वर्ष सनदी अधिकारी, लोकसभेची निवडणूक लढवलेला राजकीय कार्यकर्ता आहे. या सर्व भूमिका मधून मराठ्यासह बहुजन समाज जपान, चीन सारख्या देशाच्या मागे का याचा अभ्यास करीत आहे. आणि इथल्या वर्णवादी सामाजिक व्यवस्थेमधील ब्राह्मण हा सगळ्यात महत्त्वाचा शत्रू आहे असे माझ्या निदर्शनास आलेले आहे. ते पुराव्यासह मी माझ्या लेखात मांडीत असतो.
* माझा मुलगा आरजे संग्राम आणि प्रसन्ना यांच्या बद्दल इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीने बोलले जाते. ते दोघे समवयस्क मित्र आहेत. प्रसन्नाजी या तरुणाबद्दल मला आदर आहे.
* प्रसन्न जोशी निव्वळ मीडियामध्ये नाहीत. ते साहित्य, कला, शिक्षण क्षेत्र, सामाजिक, राजकीय, परिवर्तन वादी चळवळी,….., जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात ठासून भरलेले आहेत.
* माझ्या तोंडून ब्राह्मण शब्द आल्याबरोबर प्रसन्नाच्या शरीरामध्ये हा सिंह कुठून उफाळून आला? तो आला त्यांच्या अबोध मनातून. ही उर्मी त्यांच्या बालपणातील संगोपनातून, संस्कारातून व त्यांच्या अवतीभवती असलेल्या वातावरणातून त्यांच्या मनावर बिंबवली गेली. पण जाहीरपणे ती मांडू लागलो तर जगणं अवघड होईल म्हणून ती त्यांच्या सह त्या सर्वांच्या अबोध मनामध्ये साठली गेलेली आहे.
* एरवी त्यांचा दिसणारा चांगुलपणा हा पाण्यात तरंगणाऱ्या बर्फाच्या वरच्या फक्त एक अष्टमांस भागासारखा आहे. माझा आवाज बंद करताना आलेला कावे बाजपणा हा पाण्यात बुडालेल्या सात अष्टमांस भागातून आलेला होता.स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्या प्रत्येकाचा पाण्याखाली बुडालेला भाग असाच फार मोठा असतो असे माझे अलीकडचे निरीक्षण आहे.त्यांना आपले श्रेष्ठत्व व शोषण कायम राखण्यासाठी जे जे करावे लागते ते सगळे असे त्यांच्या अबोध मनामध्ये ठासून भरलेले असते. परिस्थितीनुसार ते वर येते. काही वेळा जाणून बुजून consciously तर काही वेळा त्यांना जाणीव न होता (unconsciously ) येते. आणि म्हणून गेली अनेक वर्ष मी आमच्या हिंदू धर्मातील ब्राह्मणाबद्दल लिहीत असतो. अनेकांना ते पटत नाही. पण ते एक वास्तव आहे. अबोध मनामध्ये वर्ण श्रेष्ठत्व घेऊन जगणाऱ्या ब्राह्मणांना त्याची जाणीव करून देणे हे प्राथमिक काम केले पाहिजे.
स्वतःला ब्राह्मण म्हणवीनाऱ्या मंडळींमध्ये हे कुठून येते? शंभर वर्षाचा क्षत्रिय (बहुजन) आणि दहा वर्षाचा ब्राह्मण यात बाप कोण?मुलगा कोण? ब्राह्मण बाप असतो (इति मनुस्मृती). माझ्या मुलाच्या वयाचा हा ब्राह्मणाचा पोरगा माझा बाप ठरतो. गेले दोन हजार वर्ष या ब्राह्मणाविरुद्ध कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न का केला नसावा?
‘ जो ब्राह्मणा शेजारी बसेल म्हणजे ब्राह्मणा इतके ज्ञान आहे असे दाखवेल अशा इसमाचा कुला/ढुंगण कापून राजाने त्याला नगराबाहेर हाकलून द्यावे. ‘
‘जो ब्राह्मणाला प्रति प्रश्न विचारेल राजाने अशा इसमाच्या कानात तापलेले शिषे ओतावे.’ इति मनुस्मृति.
त्यामुळे गेले दोन हजार वर्षे आमचा आवाज बंद केला होता. स्वातंत्र्य मिळाले. राज्यघटना आली. पण आधुनिक मनु प्रसन्ना जोशी आणि मंडळी हे तर त्याच ताकतीने आवाज बंद करीत आहेत. देशात राज्यघटना येऊन 70 वर्षे झाल्यानंतर आणि तोही ज्याला कायदा माहिती आहे कायदा राबवलेला आहे अशा माझ्यासारख्या एका निवृत्त सनदी अधिकाऱ्याचा!
मनूच्या पाल्यांनो, तुम्ही एकोणिसाव्या शतकात जपान मध्ये झालेली ‘माझी क्रांती’ कृपया समजून घ्यावी अशी विनंती. स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणविणाऱ्या पाच टक्के सामुराई या उच्चवर्णीय जातीने आपली हत्यारे खाली ठेवली. आपण सगळे जपानी लोक समान आहोत असे स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी जाहीर केले. त्यानंतर जपान सारखे राष्ट्र ही मोठी महासत्ता बनली. तुम्ही मात्र भारतातील सगळी जमात महाशक्ती बनविण्याच्या ऐवजी फक्त ब्राह्मणांना शक्तिमान बनवीत आहात . आपण सगळेजण चिंपंझी माकडापासून उत्क्रांत झालोत हे तुम्हीही लक्षात असू द्या. तुम्ही आणि आम्ही एकत्रित बसून समता (equality) यासह राज्यघटनेतील सर्व मूल्य प्रस्थापित करूया. जपान मधील सामुराई जमाती प्रमाणे मानवी इतिहासात ब्राह्मण समाजाचे नाव निर्माण करता येईल.
नाही तरी आम्ही इतर समाज लोकशाहीच्या मार्गाने समता सह सर्व मूल्य प्रस्थापित करणार आहोतच. मग अनेकांना आपण ब्राह्मण आहोत हे सांगायला देखील लाज वाटेल. म्हणून सावधान!
–सुरेश खोपडे
