नांदेड:- प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यात राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी सद्यस्थितीत सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) अनिवार्य असल्याचे परिपत्रक राज्याच्या कृषी विभागाने नुकतेच निर्गमीत केले आहे.
११ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या लाभासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक फार्मर आइडी यापूर्वीच (१५/०४/२०२५ पासून ) अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) बंधनकारक करण्यात आला आहे. शेती आणि शेती विकासाच्या विविध योजनांचा लाभ आता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.). असल्याशिवाय मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील सर्व शेतक-यांनी जवळच्या सीएससी , आपले सरकार केंद्रावर जावून अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत नोंदणी करुन शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आय.डी.) प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
