नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या दरोडा प्रकरणातील सोने नांदेडला विकल्याच्या कारणावरून छत्रपती संभाजीनगरच्या पोलीसांनी इतवारा पोलीसांच्या मदतीसह सराफा भागातून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.
काही दिवसांपुर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये दरोडा झाला होता. त्यामध्ये 8 किलो सोने आणि 40 किलो चांदी चोरीला गेली होती अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या दरोडेखोरांचा तपास घेतांना छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी एका आरोपीवर गोळीबार करून स्वत:च्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्याचा खात्मा केला होता. सध्या पाच आरोपी छत्रपती संभाजीनगर पोलीसांच्या ताब्यात आहेत. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपल्या गुन्ह्याचा शोध करतांना छत्रपती संभाजीनगर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार 200 ग्रॅम सोने नांदेडला विकले आहे. याचा माग काढत छत्रपती संभाजीनगर पोलीस नांदेडला आले. त्यांनी दरोडेखोरांनी दिलेल्या माहितीनुसार ज्याला त्यांनी सोने दिले होते. त्याला इतवारा पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले. नांदेडच्या त्या माणसाने ते दरोड्यातील सोने वितळवून त्याचे बिस्कीट तयार करून नांदेडच्या सोनाराला विकल्याची माहिती दिली. इतवारा पोलीसांच्या मदतीने छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी एक सोनार आणि सोनाराला सोने विकणारा अशा दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या या दोघांची चौकशी इतवारा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

