नांदेड:- कार्यालयीन कामकाजात उत्कृष्टता येण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, याविषयावर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाचेवतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महाराष्ट्र ज्ञान महामंडळांच्या तज्ञ प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या निर्देशानुसार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 30 मे रोजी डॉ.शंकरराव चव्हाण नियोजन भवन, मुख्य प्रेक्षागृहात कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली.
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी कार्यालयीन कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्ता (A.I) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याअनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. पॉवर पॉइंट सादरीकरणाच्या माध्यमातून विविध उपयोजन व टूल्स चा दैनंदिन कामकाजात प्रत्यक्ष वापर कसा करावा याबाबत ओघवत्या संवाद शैलीत माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामनगावे तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी रुपाली चौगुले यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, राजकुमार माने, तहसिलदार शंकर लाड, विपीन पाटील, विकास बिरादार, प्रगती चोंडेकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत मस्के, नायब तहसिलदार भगवान हंबर्डे, मकरंद दिवाकर, उषा इज्जपवार, स्वप्निल दिगलवार, जिल्हा व्यवस्थापक पंढरीनाथ आघाव , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय, भूमी अभिलेख, नगरपालिका प्रशासन, नियोजन भवन, जिल्हा कोषागार कार्यालयातील सर्व संवर्गातील अधिकारी- कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
