छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)-सध्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. यामध्ये जिल्हा पोलीस दलात 100 ते 1000 मोदकांपर्यंत प्रसाद अर्पण केल्यानंतर नवीन नियुक्त्या मिळणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. या कामाचा ठेका मात्र औरंगाबाद ग्रामीण येथे आस्थापनेवर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडे आहे असेही सांगितले जात आहे.
सध्या मे महिना सुरू आहे आणि मे महिन्यातील 13 दिवस शिल्लक आहे. अत्यंत धावपळीचे हे 13 दिवस असतील कारण बहुतेकांना आपल्या मर्जीच्या ठिकाणी नियुक्ती मिळावी असा प्रयास प्रत्येक जण करत असतो. त्यासाठी तो वेगवेगळ्या देवांकडे मागणे मागत असतो. यश कोणत्या देवाकडे येईल याची खात्री नसते. मात्र हा सर्व सामान्य नियम आहे की, इकडे आपले मोठे काम व्हावे अशी इच्छा देवाकडे व्यक्त करतो आणि प्रसादात मात्र थोडेसे मोदक देवाकडे सादर करतो. परंतू देव माहित नसल्यामुळे बहुदा अडचण होते. तरी नांदेड जिल्ह्यामधील देव सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीणच्या आस्थापनेवर असल्याची माहिती जिल्ह्यात कार्यरत असणारे जवळपास 3200 पोलीस आणि 600 अधिकारी यांना माहितच आहे. यामधील काही जणांना त्या देवाकडे डोके टेकायचेच नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून ती मंडळी मात्र ठेवली अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान या संत वचनाप्रमाणे आपले मार्गक्रमण करण्यास तयार असतात. माहिती देणाऱ्यांनी तर असेही सांगितले आहे की, छत्रपती संभाजीनगर येथे आस्थापनेवरव असलेल्या देवापेक्षा मोठा देव दुसरा सुध्दा आहे आणि तेथून सुध्दा हा कारभार चालविला जाणार आहे. याबाबतची माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांना आहे की, नाही याबद्दल माहिती नाही. येणाऱ्या 13 दिवसात झालेल्या नियुक्त्यांचा अभ्यास केल्यावर कोणी किती मोदकांचा प्रसाद देवासमोर ठेवला होता याची माहिती सुध्दा येईल. काही दिवसांपुर्वीच एका व्यक्तीने पैनगंगा पलिकडून शहरातील विशेष कार्यालयात येण्यासाठी 500 मोदकांचा प्रसाद अर्पण केला होता असेही सांगितले जात आहे. आता मोदकांच्या प्रसादानंतरच नियुक्ती मिळणार असेल तर त्यात काही हरकत पण नाही, कोणाला नसावी पण. तरी पण मोदक प्रसाद अर्पण करून घेण्याची ही वृत्ती मात्र नक्कीच चांगली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहित्या अशाच पध्दतीने प्रसारीत करायच्या असतात.
100 ते 1000 पर्यंतचा मोदक प्रसाद अर्पण केला तरच पोलीस दलात नियुक्त्या मिळणार
