नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात अवैध धंदे सुरूच आहेत. गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा असते. त्यात मोठ-मोठे दिग्गज कार्यरत असतांना सुध्दा अवैध धंदे कसे सुरू आहेत हा प्रश्न विचारला तर कोणाला राग येण्याचे काही कारण नाही. आज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार लाखो रुपयांच्या चोऱ्या सुध्दा नमुद झाल्या आहेत. कर्तव्यदक्ष लोकांची भरती केलेल्या स्थानिक गुन्हा शाखेतील मंडळी काय करत आहेत हा प्र्रश्न कोणाला विचारावा.
नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या प्रेसनोट माध्यमातून येणाऱ्या अनेक माहितीच्या आधारांवर नांदेड जिल्ह्यात मटका जुगारावर कार्यवाही केल्याची माहिती प्रसिध्दीसाठी पाठवलेली असते. परंतू आजही अनेक ठिकाणी फक्त काही लोकांच्या आशिर्वादाने आता ते खाजगी लोक आहेत की, सरकारी लोक आहेत हे माहित नाही पण अवैध धंदे सुरूच आहेत. असाच एक व्हिडीओ काल प्राप्त झाला. हा व्हिडीओ नदीकाठच्या लोकवस्तीचा आहे. आता तो भाग कोणत्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो याची माहिती मात्र व्हिडीओवरुन स्पष्ट होत नाही. परंतू त्याची तपासणी केली असता तो व्हिडीओ खुदबईनगर भागातील असल्याचे जाणकारांनी सांगितले.
शहरात किंवा जिल्ह्यात प्रत्येक घटनेचा समांतर तपास करण्याचा अधिकार स्थानिक गुन्हा शाखेला असतात. तसेच अवैध धंदे बंद ठेवण्याची जबाबदारी सुध्दा याच शाखेवर असते. पण असे काही घडत आहे असे वाटत नाही. काही पोलीस अंमलदारांना नांदेडच्या शेवटच्या पोलीस ठाण्यात पाठविल्यानंतर सुध्दा त्यातील एक जण आजही एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यासाठी कलेक्टरचे काम करतो अशी माहिती प्राप्त झाली आहे. सोबतच स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना त्याच शाखेत काम करण्याची एक नवीन होड मागील काही महिन्यापासून सुरू आहे. एखाद्या प्रकरणाच्या कामासाठी काही लोकांना बोलाविण्यात आले होते. पण ते पोलीस अंमलदार बाहेर विशेष करून अवैध धंदे करणाऱ्यांना आम्ही स्थानिक गुन्हा शाखेचेच आहोत असे सांगत आहेत. स्थानिक गुन्हा शाखेत काम करणाऱ्या काही पोलीसांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलेक्टरचे काम करतांना अनेकांनी पाहिले आहे. पण त्यावर नियंत्रण कसे नाही हा प्रश्न विचारला जात आहे. अशा प्रसारीत होणाऱ्या बातम्यांना येलो जर्नलिझमचे नाव देवून आम्ही दुधाने अंघोळ केली आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करतात.
संबंधीत व्हिडीओ….
दमदार स्थानिक गुन्हे शाखेच्या उपस्थितीत सुध्दा अवैध धंदे सुरूच
