नांदेड:–या वर्षी नांदेड जिल्ह्यातून सुमारे ९०० जण हज यात्रेसाठी जाणार आहेत. यातील सुमारे ३०० यात्रेकरू मुंबई विमानतळावरून रवाना होणार असून, त्यांचा बहुसंख्य गट २६ मे रोजी मुंबईहून हजसाठी निघणार आहे. या यात्रेकरूंनी नांदेडहून मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे रेझर्वेशन केले आहे परंतु सध्या त्यांचे तिकीट वेटिंग लिस्टवर आहे.या समस्येचे निराकरण करण्यासाठी आज खादीम-ए-हूज्जाज ट्रस्टच्या शिष्टमंडळाने नांदेडचे डीआरएम यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात २३, २४ आणि २५ मे रोजी नांदेडहून सुटणाऱ्या नंदीग्राम, देवगिरी आणि राज्यराणी एक्स्प्रेस या गाड्यांना स्लीपर वर्गाचे अतिरिक्त डबे जोडावेत, तसेच विशेष कोट्यातून हज यात्रेकरूंच्या तिकिटांचे रेझर्वेशन कन्फर्म करावे, अशी मागणी करण्यात आली.तसेच, नांदेड रेल्वे स्थानकावरून यात्रेकरूंना रवाना करताना सुरक्षा आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून कोणालाही अडचण निर्माण होणार नाही, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले.या शिष्टमंडळात खादीम-ए-हुज्जाज ट्रस्टचे अध्यक्ष अखील अहमद कंधारी, उपाध्यक्ष नवीद इक्बाल, सहसचिव अलहाज युसुफ नदीम खान, अलहाज मोहम्मद जहिरुद्दीन, अलहाज मीर जावेद अली, अलहाज शेख मोईन, अब्दुल बशीर, मोहम्मद मुजीब आणि हैदर अली सहभागी होते.
हज यात्रेकरूंना अतिरिक्त रेल्वे डबे द्या, ‘स्पेशल कोटा’तून रेझर्वेशन कन्फर्म करा–खादीम-ए-हुज्जाज ट्रस्टची मागणी
