नांदेड(प्रतिनिधी)-काल सायंकाळी बाफना परिसरात दोन मित्रांमध्ये नोकरीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकाने दुसऱ्याचा खून केला. या प्रकरणात मारेकऱ्याला मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कृष्णा पुयड (25) आणि विशाल गणेश लोकडे (24) हे दोन युवक संकेत कोठारी यांच्या संकेत एजन्सीमध्ये काम करत होते. या एजन्सीमध्ये वाहनांच्या बॅटरीची विक्री होत होती. त्यातील काही निकामी झालेल्या बॅटऱ्या कमी जास्त होवू लागल्या ही बाब कृष्णा पुयडने मालकाला सांगितली. त्यानंतर मालकाने विशाल गणेश लोकडेला कमी केले. याचा राग विशालला आला आणि तो कृष्णाला सांगत असे की, मी तुला सोडणार नाही.
काल दि.6 मे 2025 रोजी कृष्णा पुयड आपल्या दुकानातून ऍमेरोन बॅटरी या दुकानात आला आणि तेथून परत आपल्या दुकानात जात असतांना विशाल लोकडेने आपल्या हातातील खंजीर कृष्णाच्या पोटात खुपसले. हा घटनाक्रम सायंकाळी 7 वाजता रस्त्यावर घडला. खंजीर पोटात अडकल्याने कृष्णा पुयड जागीच मरण पावला. या संदर्भाने वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंढे करीत आहेत.
वजिराबाद पोलीसांनी मारेकरी विशाल गणेश लोकडे (24) यास त्वरीत पकडले आणि आज 7 मे रोजी या प्रकरणाच्या तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडी मिळावी म्हणून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने विशाल लोकडेला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नोकरीवरून काढून टाकल्याच्या कारणावरुन मित्राने मित्राचा खून केला
