शिक्षकाला खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक

नांदेड,(प्रतिनिधी)-एका शिक्षकाला दहा लाख रुपयाची खंडणी मागणाऱ्या दोघा जणांना भाग्यनगर पोलिसांनी अटक केली असून, खंडणीच्या गुन्ह्यात एकूण चार आरोपी आहेत. त्यापैकी एक महिला आणि एका व्यक्तीस अटक करण्यात आली.

गेल्या काही महिन्यापासून नांदेड शहर व जिल्ह्यात खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले असून, अशा खंडणीखोरांचे पाळेमुळे उखडून टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.

धोंडीबा रामराव मुळे हे मुखेड़ तालुक्यातील वसुर येथील भारतमाता ग्रामीण विकास माध्यमिक विद्यालयात सहशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

धोंडीबा मुळे हे नांदेड शहरातील गीतानगर भागात राहतात. उपरोक्त सहशिक्षक असलेल्या धोंडीबा मुळे यांना तीन अपत्य असल्याने तुमची नौकरी घालवतो, जेलमध्ये टाकतो, अशा धमक्या देऊन दहा लाखाची खंडणी मागण्यात येत होती. दरम्यान, खंडणी मागून धमक्या देणाऱ्यामध्ये जनता माहिती अधिकार समितीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा असलेल्या महिलेसह प्रशांत कमलाकर मुळे (रा. सिंदगी, ता. अहमदपूर) यांच्यासह अन्य अनोळखी महिला व एक अनोळखी पुरुषाचा समावेश आहे.

सतत दहा लाख रुपयाच्याखंडणीसाठी दबाव येत असल्याने धोंडीबा मुळे यांनी भाग्यगर पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, दहा लाखाच्या खंडणीची तडजोड होऊन

दोन लाख ११ हजार देण्याचे ठरविण्यात आले. खंडणीची रक्कम देण्याची तयारी नसल्याने व संबंधित खंडणी मागणाऱ्यांवर कारवाई करावयाची असल्याने पोलिसांनी श्रीनगर भागातील एका ज्यूस सेंटरवर सापळा रचला. 2 लाख अकरा हजारपैकी सुरुवातीला ५० हजार रुपये घेताना पोलिसांनी दोघा जणांना रंगेहात पकडले.

भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, डीबी पथकातील पोउपनि नरेश वाडेवाले, पोलीस कर्मचारी सविता बाचेवाड, सविता केळगंद्रे, विशाल माळवे, पठाण, गजानन किडे आदींनी ही कारवाई केली. पोलिसांनी आरोपी प्रशांत मुळे व जनता माहिती अधिकार समितीच्या महिला अध्यक्षाला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!