13 मार्च शेवटची संधी! नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ‘ॲग्रीस्टॅक’साठी त्वरित नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन 

नांदेड:- केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची केवळ ३२ टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. १३ मार्च हा या विशेष नोंदणी सप्ताहाचा अंतिम दिवस असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्ह्यातील २ लक्ष ४५ हजार २७६ शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असली, तरी अपेक्षित संख्येपेक्षा हा आकडा कमी आहे. त्यामुळे १२ आणि १३ मार्च या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणावर नोंदणी होण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे.

सध्याच्या नोंदणीमध्ये हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक, कंधार तालुका पिछाडीवर

नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यांमध्ये हिमायतनगर तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर कंधार तालुक्यात अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकऱ्यांनी आपल्या गावातील CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर) येथे जाऊन आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक आणि सातबारा उतारा (७/१२) यासह नोंदणी करावी. नोंदणी प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.

ई-केवायसी व इतर योजनांचा लाभ

यासोबतच, रेशन कार्ड धारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक असून, ते गावातील रास्तभाव दुकानात बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून पूर्ण करता येईल. तसेच, शेतकऱ्यांनी ‘आयुष्यमान भारत कार्ड’ साठी देखील आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करावी.

शेतकऱ्यांनो,घाई करा!

१३ मार्च हा शेवटचा दिवस असल्याने नोंदणी टाळाटाळ न करता त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी. ‘ॲग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण, पीक विमा, पीककर्ज आणि सरकारी योजनांचा अधिक पारदर्शक आणि वेगवान लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही संधी दवडू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!