नांदेड – सन 2024-25 या वर्षात इ. 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्याना सन 2025-26 या वर्षासाठी जेईई, नीट, सीईटी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. या प्रमाणपत्राच्या अभावी त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे सोमवार 17 मार्च 2025 रोजी एक दिवसीय विशेष मोहिम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा लाभ घेण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इ. 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी सन 2025-26 या वर्षात जेईई, नीट, सीईटी अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत. अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीकडे त्यांचे जाती दावा प्रकरण दाखल केलेले आहे. परंतु ज्या जाती दावा प्रकरणातील कागदपत्रे पुराव्या अभावी त्रुटी आढळून आल्याने अद्यापपर्यत जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. अशा विद्यार्थ्यांनी सोमवार 17 मार्च 2025 रोजी विशेष मोहिम शिबिराच्या दिवशी कार्यालयीन वेळेत समितीकडे दाखल केलेल्या जाती दावा प्रकरणांची पावती व त्रुटी पुर्ततेच्या मुळ कागदपत्रासह समिती कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष , उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांनी केले आहे. समिती कार्यालयाचा पत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, हिंगोली रोड, नांदेड असून या ठिकाणी शिबिराच्या दिवशी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.