शेतकरी व ग्राहकांनी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवात सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर

17 व 18 मार्च रोजी जिल्हा कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

 नांदेड:-  महाराष्ट्र कृषी विभाग व रोटरी क्लब, नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा कृषी व धान्य महोत्सव 2025 दिनांक 17 ते 18 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केला आहे. हा कृषी महोत्सव कृषि उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा, नांदेड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यत आयोजित केला आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कृषी व धान्य महोत्सवास भेट देवून शेतमाल खरेदी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

या कृषी महोत्सवात परिसंवाद व चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री व कृषि प्रदर्शन, कृषि विज्ञान केंद्र, कृषी विद्यापिठाचे स्टॉल, विविध कृषी निगडित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन व कृषी संलग्न शासकीय विभागाचे 50 स्टॉल  उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला गटांचा सक्रिय सहभाग या महोत्सवात राहणार आहे.

या महोत्सवांच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल गहु, ज्वारी, तांदुळ, तुर, मुग, उडीद, चनादाळ, हळद, मिरची, मसाले विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी तसेच नाविण्यपूर्ण उत्पादने जसे. मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी. तसेच टरबूज, खरबूज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तसेच जात्यावरील सेंद्रीय डाळ, गोदाकाठची ज्वारी, सेंद्रीय हिरव्या भाज्या, फळभाज्या व फूलभाज्या व रानफळे विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांनी विविध उत्पादित केलेले लाकडी घाण्याचे करडई, भुईमुग, जवस, तीळाचे तेल, बांबुपासून तयार करण्यात आलेले वस्तु केळीचे वेफर्स यांचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. डिंक, बिब्याची गोडंबी आदी कच्चा माल उपलब्ध राहणार आहे.

या महोत्सवामध्ये शहरातील व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेटी द्याव्यात याचे नियोजन करण्यात येणार आहे. हा महोत्सव नांदेड शहरवासियांना मेजवानी असून सर्वानी यास भेट देवून शेतमाल खरेदी करावा व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून त्यांचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्माचे दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!