पोलीस अंमलदार तानाजी येळगेसह तीन पोलीस माहूरच्या मालकाच्या सेवेत

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेतील काम बदली झालेल्या काही लोकांशिवाय चालूच शकत नाही अशा आशयाच्या बातम्या वास्तव न्युज लाईव्हने अनेकदा प्रसिध्द केल्या. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी काल त्यातील एकासह स्थानिक गुन्हा शाखेतील एक आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील एक अशा तिघांना अत्यंत तातडीने माहुरच्या मालकाच्या सेवेत पाठविले आहे. जिल्ह्यात बिट वाटण्यासाठी सुध्दा लिलावाचा प्रकार झाला होता म्हणे. तो पुर्ण झाला की नाही याबाबतची माहिती स्पष्ट झाली नाही.
स्थानिक गुन्हा शाखेतून आतंकवादी विरोधी पथकात विशेष करून रिंदा पथक लिहुन पोलीस अंमलदार तानाजी येळगे बक्कल नंबर 1601 याची बदली करण्यात आली होती. परंतू त्यांच्या कामाची फक्त भिंत बदलली पण ते काम स्थानिक गुन्हा शाखेतच करत होते. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेमध्ये नवीन बऱ्याच नियुक्त्या झाल्या. त्यातील अनेक जण तर कार्यालयात सुध्दा येत नाहीत असे सांगितले जाते. त्यात एक पोलीस अंमलदार राहुल लाठकर बक्कल नंबर 511 यांची सुध्दा स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती झाली होती. या दोघांचा एक लाडका मित्र आहे. पोलीस अंमलदार अंकुश लांडगे बकल नंबर 1335 यांची नियुक्ती विमानतळ पोलीस ठाण्यात आहे.
वास्तव न्युज लाईव्हला प्राप्त झालेल्या आदेशानुसार जावक क्रमांक 1708 प्रमाणे या तिघांना सध्या विनंती बदली या सदरात पोलीस ठाणे माहुर येथे पाठविण्यात आले आहे. सर्वसाधारण बदल्या होण्यासाठी आता दीड महिना उरला असतांना त्या अगोदरच या तिघांच्या बदल्या करणे हा चर्चेचा विषय झाला आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात सर्वकाही आलबेल आहे असे म्हणता येत नाही. तानाजी येळगेने तर दहशतवाद विरोधी पथकात नेमणूक झाल्यानंतर त्या पथकाचे काम कधीच केेले नाही. त्याची नियुक्ती तेथे असतांना सुध्दा ते एलसीबीमधीलच काम करत होते. स्थानिक गुन्हा शाखा सुध्दा एखाद्या कार्यवाहीची प्रेसनोट जारी करतांना त्यांचे नाव सुध्दा लिहित होते. बहुतेक त्यांना त्या कामाचे बक्षीस सुध्दा देण्यात आले असतील. स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती नसतांना त्यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या चार चाकी गाड्या वापरल्या आहेत.
काही दिवसांपुर्वी वास्तव न्युज लाईव्हने तानाजी येळगे एका वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी वाळू या व्यवसायातील सर्व जबाबदारीची कामे पुर्ण करत आहेत असे वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर त्यांना काही दिवस त्या जबाबदारीतून मुक्तपण करण्यात आले होते. पण पुन्हा एकदा त्यांनी ती सुत्रे आपल्या हातात घेतली होती. पोलीस विभागातील काही लोक सांगतात भल्या पहाटे दोन दिवसांपुर्वी झालेल्या एका वाळू कार्यवाहीच्या पाठीमागे सुध्दा त्यांचाच हात आहे. बहुदा त्यामुळेच त्यांची बदली झाली असावी असे बोलले जात आहे. म्हणूनच असे बोलले जाते की, मांजर डोळे झाकून दुध पिते आणि तिला वाटते की, मला कोणी पाहत नाही. पण जगाच्या डोळ्यामध्ये काही मोतीबिंदु झालेले नाही. हेही तेवढेच खरे आहे.
बिट वाटपासाठी लिलाव पध्दती सुध्दा अंमलात आली होती म्हणे. कोण जास्त काम करून जास्त मेहनत करेल या धर्तीवर ही बोली होती. त्यानुसार काही जणांना बिट बदलून मिळाले होते. पण 24 तासातच जसे थे परिस्थिती अंमलात आली. चांगले काम आणि जास्त काम या लिलावाला का पुर्णत्व आले नाही हा विषय वेगळा आहे. बदली झालेल्या तानाजी येळगे, राहुल लाठकर आणि अंकुश लांडगे यांना कार्यमुक्त करण्यात आले की, नाही याची माहिती वृत्तलिहिपर्यंत आम्हाला प्राप्त झाली नाही. पण माहूरच्या मालकाकडे सेवा करण्याची संधी मिळाली असल्याने हा प्रकार प्रयागराजमध्ये डुबकी मारल्यासारखाच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!