दुबईमध्ये फासी दिलेल्या शहजादीचा आज दफनविधी झाला ; कोणाचा जीव वाचवा आणि कोणाचा नाही याचा भारत सरकार विचार करते

एखाद्या नागरीकामुळे दोन देशांमध्ये असलेले चांगले संबंध अत्यंत विकोपाला जावू शकतात. परंतू भारतात नागरीकांचे नाव ऐकल्यानंतर त्याचा जीव वाचवावा की नाही हे ठरते. अशाच एका शहजादीला भारताचे संबंध चांगले असणाऱ्या युएई सरकारने दुबईमध्ये फाशीवर चढवले. केंद्र शासनाने शहजादीच्या वडीलांना याबद्दल काहीच माहिती दिली नाही. उच्च न्यायालयाने जबाब मागितल्यानंतर भारताच्या विदेश मंत्रालयाने त्या शहजादीला 13 दिवस अगोदरच फाशी देण्यात आली होती हे सांगितले. तिच्या वडीलांच्या मागणीप्रमाणे शहजादीचे प्रेत सुध्दा प्राप्त करण्यात भारत सरकारने काहीच काम केले नाही. आज सकाळी दुबईमध्ये शहजादीचा दफनविधी सुध्दा पार पडला. काय अपेक्षा करावी या भारतीय सरकारकडून
आम्ही लिहित असलेली माहिती वाचकांना आवडेल की नाही याची कल्पना आम्हाला नाही. कारण यात काही खळबळजनक नाही. परंतू वाचकांनी ही आमची माहिती वाचावी आणि त्यातून बोध जरूर घ्यावा अशी इच्छा आहे. कोणत्याही आई-वडीलांना आपल्या सांसारीक जीवनात आपत्य प्राप्त झाले तर मुलगा झाला तर तो राजकुमार किंवा शहजादाच असतो आणि मुलगी झाली तर ती राजकुमारी किंवा शहजादीच असते. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यामध्ये शहजादी शब्बीर खान ही बालिका 8 वर्षाची असतांना जेवण तयार करतांना तिच्या अंगावर गरम पाणी पडले आणि त्यामुळे तिचा चेहरा भाजला गेला. परंतू संघर्षातूनच यश असते या उक्तीप्रमाणे या बालिकेने आपला चेहऱ्यापेक्षा शिक्षणाकडे जास्त लक्ष दिले आणि ती चांगली शिकली सवरली. आपल्या जीवनात ती हारली नाही. तिने शिक्षण पुर्ण झाल्यानंतर रोटी बॅंक नावाच्या एका एनजीओमध्ये काम सुरू केले आणि समाजसेवेत गर्क झाली. आपल्या जीवनात तिचे ध्येय होते की, मी जेंव्हा पैसे कमावेल तेंव्हा प्लॉस्टीक सर्जरी करून माझा चेहरा दुरूस्त करून घेईल.
आपल्या जीवनाच्या मार्गक्रमणात शहजादीची भेट फेसबुकच्या माध्यमातून आग्रा येथील उजेर या युवकासोबत झाली. मग प्रेमाच्या आणा-भाका घेण्यात आल्या. तुझ्या चेहऱ्यापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे अशी बोथट भावना दाखवून उजेरने कटरचला. शहजादीला सांगितले की, आपण दोघे दुबईला जाऊत आणि तेथे जाऊन तुझ्या चेहऱ्याची प्लॉस्टीक सर्जरी करू. दोघे दुबईला गेले आणि येथेच शहजादीचा घात झाला. उजेरची आत्या आणि तिचा नवरा आपल्या अत्यंत छोटशा चार महिन्याच्या बालकासह तेथे राहत होते. शहजादीला त्यांच्या घरी सोडून उजेर पळून गेला. प्राप्त झालेल्या माहितीनुसार ते काही उजेरचे नातलग नव्हते. उजेरने काही लाखांमध्ये शहजादीची तेथे वेठबिगार म्हणून तेथे विक्री केली होती. त्यांच्याकडे असलेला चार महिन्यांचा बालक हा नेहमीच आजारी असायचा आणि त्या बालकाचे लक्ष ठेवणे, त्याची देखभाल करणे ही जबाबदारी शहजादीकडे आली. नशिबात आले म्हणून शहजादी हे निमुटपणे करत होती. कारण तिने पळण्याचा प्र्रयत्न केला. पण तिला अपयश आले. त्यासाठी तिला मार खावा लागला. म्हणून आलीया भोगाशी असावे सादर या युक्तीप्रमाणे शहजादी आपले जीवन कापत होती.
काही दिवसानंतर त्या चार महिन्याच्या बालकाला एक लस देण्यात आली. त्या लसीच्या टोचणीनंतर त्या बालकाचा मृत्यू झाला. दुबई पोलीस प्रशासनाने याची चौकशी सुरू केली तेंव्हा त्यात लस, देणारा दवाखाना या सर्व बाबी येणार होत्या. कारण दुबईमधील राज्य हे धर्मावर आधारीत आहे आणि त्याचप्रमाणे तेथे निर्णय होतात. पण त्यावेळी त्या मरण पावलेल्या बालकाच्या आई-वडीलांनी या चौकशीची गरज नाही असे प्रशासनाला सांगितल्याने ती चौकशी संचिका बंद झाली.
त्यानंतर दोन महिन्यांनी एकदा त्या पती-पत्नीने शहजादीला सांगितले आम्ही स्वत:च तुला भारताच्या विमानात बसवून टाकू पण एकदा तु हे सांग की आमच्या बालकाला तु मारले आहेस. अगोदरच नरकात राहणारी शहजादी यासाठी तयार झाली. तिला वाटले की, असे म्हटल्यामुळे माझी सुटका होणार असेल तर मग त्यात वाईट काय? तिने या पती-पत्नींच्या सांगण्याप्रमाणे मीच बालकाचा खून केल्याचे शब्द वापरले आणि त्या दोघांनी याचा व्हिडीओ तयार केला. व्हिडीओ तयार झाल्यावर लगेच चल आता तुला विमानात बसवून देवू म्हणून शहजादीला गाडीत बसवले आणि गाडी थेट दुबईच्या पोलीस ठाण्यात पोहचली. तेथे त्या दोघांनी तो व्हिडीओ दाखवला आणि शहजादी गजाआड झाली.
या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. त्या बालकाचा मृत्यू लस दिल्यानंतर झाला होता. त्याची चौकशी पोलीस करणार होती. पण आई-वडीलांनी करू दिले नाही आणि खोटे सांगून दोन महिन्यानंतर शहजादीचा व्हिडीओ बनवला आणि शहजादीला गजाआड करून टाकले. ज्याप्रमाणे फाशी दिली जाते. त्यात त्या व्यक्तीला शेवटी इच्छा काय आहे आणि ती मागणी पुर्ण करावी असे सांगण्याचा अधिकार आहे. शहजादीने 14 फेबु्रवारी 2025 रोजी आपल्या वडीलांना फोन केला हीच तिने सांगितलेली शेवटची इच्छा होती. शहजादी आपल्या वडीलांना म्हणाली. मी आज तुम्हाला शेवटचे बोलत आहे. यानंतर तुमची माझी भेट अशक्य आहे. तुम्ही माझ्या शोधासाठी कोणाचे उंबरठे झिजवू नका. त्यातून काही साध्य होणार नाही. पण बाप-बापच असतो. त्याने त्वरीत प्रभावाने सरकारकडे आपले गाऱ्हाणे नेले. परंतू सरकारला तर छाव्यांना दुध पाजविण्यापासून वेळ नाही, रिल तयार करायचे आहेत आणि शहजादी शब्बीर खान या युवतीला शोधण्याची गरज काय? अशा अनेक कारणांमधून सरकारने शब्बीर खानच्या अर्जावर विचार केला नाही. करता आला असता. कारण युएई सरकारचे आणि भारत सरकारचे संबंध चांगले आहेत. शहजादीचा जीव वाचविता आला असता. परंतू ती शहजादी असल्यामुळेच वाचविला नाही काय ? अशी शंका यायला लागली आहे. शब्बीर खान उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने सरकारला जबाब विचारला तेंव्हा विदेश मंत्रालयाने सांगितले की, 13 दिवसांपुर्वी शहजादीला फासी देण्यात आली आहे. तेंव्हा शब्बीर खानने माझ्या मुलीचे प्रेत तरी मला परत करा अशी विनंती केली तेंव्हा सरकारने सांगितले की, ते सुध्दा आता अशक्य आहे. कारण 5 मार्च 2025 रोजी सकाळी तिचा दफनविधी होणार आहे.
या आमच्या बातमी, आमच्या विश्लेषणामध्ये काही खळबळजनक नसेल परंतू ज्या देशांसोबत आपले संबंध चांगले आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आपल्या एका नागरीक युवतीचा जिव का सरकारने वाचविला नाही हा प्रश्न आम्हाला वाचकांसमोर मांडायचा आहे. नाही तर अत्यंत दादागिरीने बोलणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांच्या प्रत्येक प्रस्तावाला मंजुर मिळते आहे आणि त्यामुळे भारत दरवर्षी 6 लाख कोटी रुपयांनी गंडला जाणार आहे. युएई सरकारने नाही म्हटलेच नव्हते. पण तुम्ही विचारणाच केली नाही तर ते होकार कसे देतील. हा प्रश्न महत्वपुर्ण आहे.

One thought on “दुबईमध्ये फासी दिलेल्या शहजादीचा आज दफनविधी झाला ; कोणाचा जीव वाचवा आणि कोणाचा नाही याचा भारत सरकार विचार करते

  1. Kanthak Suryatale

    मृत शहाजादी हिला तीव्र दुःखी मनाने आदरांजली व्यक्त करतो, तथापि
    तुमच्या विश्लेषणात अनेक थापा मारलेल्या आहेत हे जाणवते.

    उच्च न्यायलयाने भारत सरकारला उत्तर मागितल्यानंतर शहाजादीला फाशी देण्यात आल्याचे स्पष्ट झाले असे तुम्ही म्हणता, परंतु उजेरनामक व्यक्तीशी त्या शहाजादिने विवाह केला त्या उजेरची कौटुंबिक तपासणी व सरकारी कार्यालयात विवाह नोंदणी केली होती का याची काहीच तपासणी केली नाही?
    किंबहुना शाहजादी ज्या समाजात आहे, त्या समाजात विवाह आणि तलाक यांच्यासंदर्भात सरकारने हस्तक्षेप केल्यास रक्तपात घडेपर्यंत दंगली – जाळपोळ घडेपर्यंत विरोधच का होतो, याचेही तुमच्याकडे उत्तर नाही.
    भारत सरकार नेहमी एम्बासीमध्ये लोकांनी आपल्या विदेश प्रवासाची माहिती द्यावी असे सांगते, मग शहाजादीने ती प्रक्रिया पूर्ण केली होती का?
    “आम्हीच तुला भारताच्या विमानात बसवू पण तू आमच्या मुलाला मारले असल्याचे सांगून टाक “, या वाक्याची सत्यता पडताळून पाहिली आहे अथवा हीसुद्धा थाप मारली आहे?

    दुबईमध्ये अनेक भारतीय अशा पद्धतीने फसलेल्या अवस्थेत जगत आहेत, त्याविषयी काहीतरी सकारात्मक व्हायला हवे, परंतु त्यासाठी सध्याचे सरकार पूर्वीच्या सरकारपेक्षा नक्कीच अधिक काम करत आहे.

    तामिळनाडू आणि गुजरात येथे मासेमारीच्या व्यवसायात शहाजदी ज्या समाजाची होते त्याचे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत व अनेकदा लंकेच्या आणि पाकिस्तानच्या सरकारने त्यांना अटक केली आहे, त्यांची सोडवणूक याच सरकारने केली हे लपवू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!