नांदेड(प्रतिनिधी)-एका घरफोडीचा तपास करतांना वजिराबाद पोलीसांनी 2 विधीसंघर्षग्रस्त बालकांना ज्यामध्ये एक बालक आणि एक बालिका आहे. त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 4 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम, 15 ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी असा मोठा ऐवज जप्त केला आहे. आपल्या घरातील अल्पवयीन बालकांचे लक्ष ठेवण्याची जबाबदारी पोलीसांची नसून पालकांची आहे याची जागृरुकता कधी येईल हा प्र्रश्न मात्र अनेकदा अनुत्तरीत राहतो आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये दुल्हेशाह रहेमाननगर येथे सय्यद सर्फराज सय्यद मुनीर यांच्या घरी चोरी झाली होती. या चोरीचा शोध घेत असतांना वजिराबाद येथील पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे, पोलीस उपनिरिक्षक व्ही.ए.बिक्कड यांच्यासह पोलीस अंमलदार विजयकुमार नंदे, शिवसांब मठपती, नागमवाड, शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, भाऊसाहेब राठोड, ज्वालासिंग बावरी, साखरे आणि शुभांगी कोरेगावे आदींनी दोन विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. पोलीसांची ही माहिती सुध्दा अत्यंत महत्वाची आहे. या बालकांकडून वजिराबाद पोलीसांनी 4 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम, 15 ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी असा मोठा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये 5 ग्रॅम वजनाची सोन्याची गलसर, 3 ग्रॅम वजनातील कानातील झुंबर, अडीच ग्रॅम वजनाची कानातील बाली, साडे चार ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि पायातील वाळे, अर्धा किलो चांदी असा एकूण 5 लाख 47 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरी करणारा बालक आणि बालिका यांच्या आई-वडीलांसमोर सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी वजिराबाद पोलीसांचे या उत्कृष्ट कार्यवाहीसाठी अभिनंदन केले आहे.
अल्पवयीन बालक आणि बालिकेकडून वजिराबाद पोलीसांनी मोठे घबाड जप्त केले
