कंधार-महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संतांची सामाजिक चळवळ खऱ्या अर्थाने सुधारणावादी होती. संतांनी जाती, धर्माच्या सीमा पार करून सहिष्णूता, समानता आणि मानवतेची शिकवण दिली. तसेच समाजातील दुर्बल लोकांना आपलसं केलं. त्यांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे. आपण सर्वांनी संतांच्या विचारांचा अंगीकार केला पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी केले.
श्रीक्षेत्र उमरज ता.कंधार येथे श्री संत सदगुरू नामदेव महाराज व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कलशारोहण सोहळा निमित्ताने 108 कुंडी विष्णूयाग महायज्ञ, अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.् यावेळी ते बोलत होते. यावेळी वृंदावनचे आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते देवकीनंदन ठाकूर महाराज, श्री संत नामदेव महाराज संस्थानचे मठाधिपती एकनाथ महाराज, सहकार मत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ऍड.मुक्तेश्वर धोंडगे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मराठवाडा देखील संतांची भूमी आहे. या भूमीला धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा वारसा आहे. मराठवाडा संतांची, महंतांची, शुरांची, कर्तृत्ववान सुपुत्रांची, ज्ञानवंताची, बुध्दीवंताची, प्रज्ञावंताची, कलावंतांची, कष्टकऱ्यांची भूमी म्हणून ओळखला जातो. मराठवाड्याला सहजासहजी काहीच मिळाले नाही. जे मिळाले ते नेहमी संघर्ष करुन मिळाले आहे. हा इतिहास सर्वांसमोर आहे. संत ज्ञानेश्वर माऊली यांनी आपणास करुणा आणि समतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या गाथातून जीवनशैली शिकवली. संत एकनाथ महाराज यांनी समाजातील विषमता दूर करण्याचं काम केलं. तसेच उमरजच्या श्री संत नामदेव महाराज यांनी परस्परातील भेदभाव, जाती-धर्माची जळमटे दूर सारुन प्रेमाची शिकवण दिली. त्यांची शिकवण येणाऱ्या पिढीला प्रेरणा आणि नवी दिशा देणारी आहे. येथील श्री संत नामदेव महाराज व विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर अतिशय सुंदर आहे. या संस्थानच्या विकासासाठी कुठेही कामी पडणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवराव पेठकर यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले. यावेळी भक्तगण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदेवांना नमन…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता श्रीक्षेत्र उमरज संस्थानला भेट देत विठ्ठल- रुक्मिणीचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच श्री संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नमन केले. यावेळी संस्थानतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला.