या दरोड्यात केरळ आणि उत्तर प्रदेशमधील दरोडेखोरांचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)-धनेगाव वळण रस्त्यावर 7 फेबु्रवारी रोजी झालेल्या दरोडा प्रकरणातील तीन जणांना नांदेड न्यायालयाने आज 4 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या दरोड्यात 15 लाख रुपये रोख रक्कम गेली होती. परंतू हा हवाला कारभारीचा पैसा असल्याने रक्कम जास्त असेल अशी शंका व्यक्त होत आहे.
7 फेबु्रवारी रोजी एक चार चाकी गाडी एम.एच.47 ए.वाय.4585 ही मुंबई येथून आली. या गाडीत हार्दिककुमार रमनभाई मोदी आणि त्यांचा सहकारी असे दोघे होते. ही गाडी रात्री 11 वाजेच्यासुमारास धनेगाव वळण रस्त्यावर आली असतांना तेथे सुरू असणाऱ्या कामामुळे गाडीची गती कमी झाली आणि त्यांच्या समोर दुसऱ्या गाडीने आडवी गाडी उभी केली. त्यातील लोकांनी उतरून हार्दिकभाई मोदी आणि त्याच्या सहकाऱ्याला बांधून दुसऱ्या कारमध्ये ठेवले आणि इतर दोन गाड्या अशा तिन गाड्या नांदेड बाहेर पळू लागल्या. हार्दिककुमार मोदीच्या कार्यालयातील व्यक्तीने गाडीचे लोकेशन पाहिले असता ती गाडी मुखेड मार्गे सलगराकडे गेली. दरम्यान 20-25 किलो मिटर दुर गेल्यावर हार्दिककुमार मोदी आणि त्याच्या सहकाऱ्याला अंधारात रस्त्यावर सोडून देण्यात आले. पुढे गाडीतील पैसे काढून ही गाडी सलगराजवळ उलटी करण्यात आली आणि सोडून दरोडेखोर पळून गेले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 150/2025 दाखल करण्यात आला होता.
जिल्ह्यातील प्रत्येक घटनेचा समांतर तपास करण्याचा अधिकार असणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणातील 3 दरोडेखोर महम्मद असगर हानिफ खान (40) धंदा कारपेंटर रा.बैलबजार जवळ कुर्ला पश्चिम मुंबई, मुस्तफा युसूफ खान (36) रा.गोवंडी मुंबई आणि प्रज्वल लालजी भोसले (26) रा.लोडे ता.चाळीसगाव जि.जळगाव या तिघांना पकडले. आज नांदेड ग्रामीण पोलीसांनी या तिघांना न्यायालयात हजर केल्यानंतर सांगितले की, या तिघांकडून रोख रक्कम 9 लाख 20 हजार रुपये मोबाईल अणि कार असा एकूण 14 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कर ण्यात आला आहे. पोलीसांनी न्यायालयात केलेल्या सादरीकरणाप्रमाणे या दरोड्यात उत्तरप्रदेश येथील राजकरण यादव, केरळ राज्यातील बैलअण्णा, केरळ येथील प्रदीप कुरूशन इजवा, किशोरभाई, राजू उर्फ बलखंडा आणि ए.पी.या बैलअण्णाचा व्यक्ती अशा 9 जणांनी हा दरोडा टाकला आहे. न्यायालयात पोलीसांची बाजू मान्य करत पकडलेल्या तिघांना 4 मार्च 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
धनेगाव येथे 15 लाखांचा दरोडा टाकणारे 3 जण 4 मार्च पर्यंत पोलीस कोठडीत
