नांदेड(प्रतिनिधी)-पती-पत्नीच्या भांडणानंतर जन्मलेल्या मुलीच्या नावासमोर तिच्या चुलत्याचे नाव लिहुन केलेल्या फसवणूक प्रकरणी इतवारा पोलीसांनी या प्रकरणातील बालिकेचा वडील आणि काका या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.या दोघांमधील बालिकाचा वडील औंढा येथील नगरसेवक आहे. या दोघांना नांदेड न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या आई-वडीलांच्या घरी राहणाऱ्या 39 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे लग्न 9 मे 2011 रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय नांदेड येथे नोंदणी पध्दतीने झाले आणि त्यानंतर 23 मे 2011 रोजी नांदेड येथील एका मंदिरात रिती रिवाजाप्रमाणे झाले. त्यांचे लग्न राहुल सुरेशअप्पा दंतवार रा.औंढा नागनाथ जि.हिंगोली यांच्यासोबत झाले होते. लग्नानंतर त्यांना दोन मुली झाल्या. त्यातील दुसऱ्या मुलीचे वय आज 10 वर्ष आहे. त्या मुलीचा जन्म 13 सप्टेंबर 2015 रोजी नांदेडच्या डॉ.मिनिल पाटील यांच्या दवाखान्यात झाला होता. त्यानंतर 17 सप्टेंबर 2015 रोजी बालिकेच्या जन्माची नोंद नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत करण्यात आली.
सन 2022 मध्ये पती राहुल सुरेशअप्पा दंतवार यांच्यासोबत किरकोळ भांडण झाल्याने त्या आपल्या आई-वडीलांकडे नांदेडला राहत आहेत. भांडण झाले तेंव्हा नवरा राहुल सुरेशअप्पा दंतवार याने दुसऱ्या मुलीच्या जन्माचे सर्व प्रमाणपत्र, आधारकार्ड आपल्या ताब्यात ठेवले. भांडणानंतर दुसऱ्या मुलीला शाळेत कशी टाकेतस अशी धमकी दिली. जुन्या आधार कार्डाला अद्यावत करण्यासाठी गेल्यानंतर हे लक्षात आले की, मुलीच्या वडीलांचे नाव राहुल असतांना मुलीचे काका सचिन सुरेशअप्पा दंतवार यांचे नाव वडीलांच्या जागी लिहिलेले आहे. ही घटना तशी भयंकरच होती. याबाबत विचारणा केली असता 14 जानेवारी 2022 रोजी आलेल्या अर्जानुसार नाव बदलल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा आम्ही माहिती अधिकार कायद्यान्वये माहिती मागितली तेंव्हा नांदेड वाघाळा महानगरपालिकेत राहुल या नावाला वलयांकित करून सचिन असे नाव लिहिले आहे. त्यासोबत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये बालिकेचे काका सचिन सुरेश दंतवार यांचे आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका आणि महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेच्या खाते पुस्तिकेची झेरॉक्स जोडली आहे. डॉ.मिनिल पाटील यांची सुध्दा खोटी स्वाक्षरी आहे. दुरूस्ती करतांना महिलेचे शपथपत्र दिले आहे. त्यावर सुध्दा खोटी स्वाक्षरी आहे. डॉ.मिनिल पाटील यांच्या दवाखान्यात 13 सप्टेंबर 2015 रोजी बालिकेचा जन्म झाल्याचा अभिलेख उपलब्ध आहे. अशा सर्व खोटा कागदपत्रांची तयारी करून बापाचे नाव असतांना चुलत्याचे नाव वडील म्हणून टाकले. यानुसार माझी व माझ्या मुलीची फसवणुक झाली आहे.
इतवारा पोलीसांनी या तक्रारीनुसार दि.22 जानेवारी 2025 रोजी औंढा नागनाथ येथील माजी नगरसेवक राहुल सुरेशअप्पा दंतवार आणि त्यांचा भाऊ सचिन सुरेशअप्पा दंतवार या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468, 469, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 26/2025 दाखल केला आहे. इतवाराचे पोलीस निरिक्षक रणजित भोईटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक विलास पवार यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्यात आला होता. काल दि.21 फेबु्रवारी रोजी विलास पवार यांनी औंढा येथील नगरसेवक राहुल सुरेश अप्पा दंतवार आणि त्यांचा भाऊ सचिन सुरेशअप्पा दंतवार या दोघांना अटक केली. आज 22 फेबु्रवारी रोजी त्या दोघांना न्यायालयात हजर करून तपासाच्या प्रगतीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलीसांची विनंती मान्य करत दंतवार बंधुंना तीन दिवस अर्थात 24 फेबु्रवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
आपल्या मुलीच्या नावात आपल्या नावाऐवजी काकाचे नाव नोंदवणाऱ्या वडील आणि काकाला पोलीस कोठडी
