नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज हे महापराक्रमी आणि आदर्श असे राजे होते. महिलांच्याबद्दल त्यांच्या मनात नित्तांत आदर होता आणि पुरोगामी विचार पुढे घेवून जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी जनसामान्यांच्या रयतेचे राज्य निर्माण केले. सर्वांना समान न्याय देणाऱ्या स्वराज्याचा त्यांनी पाया घातला आणि राज्य मजबूत केले. त्याचबरोबर पुढच्या पिढीला नवीन विचार दिले, स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. शिवरायांजवळ अलौकिक बुद्धिमत्ता होती. त्याचा वापर समाजासाठी, स्वराज्यासाठी केला असे प्रतिपादन डीवायएसपी शुभम वाठोरे यांनी केले. ते माघ पौर्णिमेनिमित्त आयोजित पौर्णिमोत्सव व शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो, भिक्खू संघासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

शिवजयंती व माघ पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात पौर्णिमोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच परित्राण पाठ, विविध गाथांचे पठण करण्यात आल्यानंतर भिक्खू संघाचे भोजनदान आणि बोधीपुजा संपन्न झाली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याचनेनंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर त्रिरत्न वंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या सत्कारानंतर धम्मदेसना संपन्न झाली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपासिका शीला पडघने यांनी भिक्खु निवासासाठी पन्नास हजार रू दान दिले व उपा. मंगल गायकवाड यांनी स्वतःचा पहिला पगार वीस हजार रू. श्रामणेर प्रशिक्षण केंद्र दीक्षाभूमी बांधकामासाठी दिला.
कार्यक्रमाचे इंजिनियर भरत कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक धुतराज यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी शांताबाई धुताडे, जनाबाई चिखलीकर यांच्यासह गंगा कॉलनी, पंचशील नगर, श्रम साफल्य नगर तसेच पिवळी गिरणी आशीर्वाद नगर येथीलउपासक – उपासिकांकडून भोजनदान देण्यात आले. दरम्यान, श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या वतीने धम्मसारथी पुरस्कार प्राप्त विठ्ठलराव लोणे, दामाजी रसाळे, शांताबाई धुताडे, शेषराव वाघमारे, कैलास सोनाळे, भीमराव नरवाडे, चंद्रकांत परघणे,अशोक हनवते, विश्वनाथ वाघमारे, जयवर्धन भोसीकर, संजय खाडे, श्रीकांत हिवाळे, राहुल पुंडगे, शामराव जोगदंड, चंद्रभीम हौजेकर, तुकाराम ढगे, एकनाथ दुधमल यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणच्या बौद्ध उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
