*सकाळी महसूलमंत्री उदघाटन करणार ;कार्यक्रमाची तयारी पूर्ण
*अविरत महसूल स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार*
*प्रशासनाकडून खेळाडू अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था*
नांदेड- महसूल विभागाच्या राज्यस्तरीय स्पर्धेची सुरुवात उद्यापासून छत्रपती संभाजी नगर विभागाच्यावतीने नांदेड येथे होत आहे. उद्या सकाळी नऊ वाजता गुरुगोविंद सिंघ जी क्रीडा संकुलनाच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. छत्रपती संभाजी नगर विभागाने या आयोजनाची पूर्ण तयारी केली असून उद्यापासून महाराष्ट्रातील,नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर,पुणे,नाशिक, कोल्हापूर विभाग तसेच जमाबंदी आयुक्त,नोंदणी महानिरीक्षणच्या चमू यांच्यातील लढती रंगणार आहे.
आज या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती दिली. महसूल विभागाचे काम सातत्याने चालणारे असते. या अविरत सुरु असलेल्या कामामधून थोडासा विसावा, आनंद देणारे क्षण या स्पर्धेमधून अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत. या स्पर्धेनंतर प्रशासकीय कामकाजात अधिक स्फुर्तीने काम करण्याची उर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. आज श्री गुरु गोविंदसिंघजी स्टेडियम येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अपर आयुक्त महसूल नयना बोंदार्डे, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदीची उपस्थिती होती.
मागील १२ ते १३ वर्षानी महसूलच्या राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत. छ. संभाजीनगरच्यावतीने नांदेड येथे महसूल राज्यस्तरीय स्पर्धाचे नियोजन योग्य रितीने करण्यात आले असून तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचे उदघाटन उद्या सकाळी 9 वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे राहणार आहेत. तर गृह, महसूल, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री योगेश कदम यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच लोकप्रतिनिधी, सर्व विभागीय आयुक्तासह, नांदेडचे यापूर्वीचे सर्व जिल्हाधिकारी, इतर जिल्हातील जिल्हाधिकारी व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच विशेष उपस्थितीमध्ये भारतीय महिला खो खो विजेता संघाच्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे या कर्णधाराची उपस्थिती राहणार आहे.
नांदेडला या राज्यस्तरीय महसूल क्रिडा स्पर्धा होत असून याची सर्व व्यवस्था, वाहतूक चांगल्या प्रकारे देण्याचे नियोजन केले आहे. या कामी अनेक समित्या स्थापन केल्या असून ज्या अधिकाऱ्यांवर यांची जबाबदारी सोपविली आहे. ते समन्वयाने या जबाबदाऱ्या पार पाडतील, असा विश्वास, अपर आयुक्त महसूल नयना बोंदार्डे यांनी व्यक्त केला.
तसेच या ठिकाणी मेडिकल पथक, फिजीओथेरपिस्ट नेमले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दि. 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पुरुष व महिला मैदानी स्पर्धा सायन्स कॉलेज, जलतरण स्पर्धा पुरुष 45 खालील व 45 वर्षावरील कै. शांताराम सगने जलतरणीका स्टेडियम जवळ नांदेड, क्रिकेट पुरुष स्टेडियमवर, खो-खो पुरुष इंदिरा गांधी मैदान स्टेडियमजवळ, हॉलीबॉल पुरुष सायन्स कॉलेज, फुटबॉल पिपल्स कॉलेज नांदेड, कबड्डी पुरुष इंदिरा गांधी मैदान स्टेडियमजवळ, बुध्दीबळ बॅडमिटन हॉल नांदेड वाघाळा महानगरपालिका, गोकुळ नगर , कॅरम व कॅरम दुहेरी पुरुष बॅडमिटन हॉल नांदेड वाघाळा महानगरपालिका, गोकुळ नगर, टेबल टेनिस पुरुष एकेरी/दुहेरी/मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, बॅडमिंटन 45 वर्षावरील एकेरी/दुहेरी/मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, लॉनटेनिस एकेरी, दुहेरी पुरुष नांदेड क्लॅब, टेबल टेनिस 45 वरील पुरुष एकेरी, दुहेरी, मिश्र जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, थ्रो-बॉल व खो-खो महिला इंदिरा गांधी मैदान, बुध्दीबळ महिला बॅडमिटन हॉल, गोकुळ नगर, कॅरम वैयक्तीक व कॅरम दुहेरी जिल्हा बॅडमिंटन हॉल, महिला टेबल टेनिस व महिला बॅडमिंटन एकेरी व दुहेरी जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, रिंग टेनिस महिला एकेरी व दुहेरी सायन्स कॉलेज, टेबल टेनिस एकेरी, दुहेरी महीला व बॅडमिटन एकेरी व दुहेरी जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल येथे होणार आहेत.
नांदेड येथे मोठया प्रमाणात राज्यभरातून महसूल खेळाडू अधिकारी व कर्मचारी यांचे आगमन होत आहे. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाने केली आहे. दिनांक 21 व 22 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन यशवंत महाविद्यालयात नांदेड येथे होणार आहे. आज क्रिकेट मॅच च्या स्वागत सामन्याने स्पर्धेचा माहोल तयार झाला आहे .पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांच्या दरम्यान हा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. तरी नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.