कक्कया – रविदास यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही यासाठी काम करावे – नामदेव फुलपगार

 

पालम (प्रतिनिधि)- राष्ट्रपुरुष वीर कक्कया आणि गुरु रविदास महाराज यांनी जो त्याग केला आणि बलिदान दिले ते व्यर्थ जाणार नाही यासाठी प्रत्येकांनी समर्पित भावनेतून सामाजिक काम करावे असे आवाहन राष्ट्रीय ढोर समाज संघटना आणि अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस नामदेव फुलपगार यांनी केले.

वीर कक्कया यांची ९२० वी आणि गुरु रविदास यांची ६२७ वी जयंती परभणी जिल्ह्य़ातील पालम येथे उत्साहात साजरी करण्यात आली, त्यावेळेस प्रमुख वक्ते म्हणून नामदेव फुलपगार बोलत होते. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते व सुप्रसिद्ध व्याख्याते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या प्रभावी भाषणात नामदेव फुलपगार पुढे म्हणाले की, वीर कक्कया यांनी सामाजिक सुधारणेबरोबरच बसवण्णा आणि वचन साहित्याच्या रक्षणासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. गुरु रविदास यांनीही जातीव्यवस्थेच्या अंतासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या दोन्ही महामानवांचा त्याग व बलिदान हे जगाच्या ईतिहासातील अजरामर असे कार्य आहे. याची जाण ठेवून कार्यकर्त्यांनी सामाजिक समतेसाठी काम करावे.

*समतावादी व्यवस्था निर्माण करावी !*

शोषणविरहित समतावादी समाज व्यवस्था निर्माण करणे हे वीर कक्कया आणि गुरु रविदास यांचे अंतिम ध्येय होते हे लक्षात घेऊन विषमतेवर आधारित व्यवस्थेला विरोध करण्याचे सामर्थ्य समाजात निर्माण झाले पाहिजे. यासाठी जयंती महोत्सवातून केवळ करमणूक नाही तर स्वाभिमानी विचारांची पेरणी आम्ही करीत आहोत असे प्रतिपादन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी अध्यक्षीय समारोप प्रसंगी केले.

महामानवांचे परिवर्तनवादी विचार प्रत्यक्षात कृतीत आणले तरच त्यांची जयंती साजरी केल्याचे खरे समाधान मिळेल. नसता मोठमोठी भाषणे देऊन निघून जाणारे व समाजावर प्रसंग आला तर दलाली करणारे भरपूर आहेत. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद ही स्वाभिमानी विचारांची लढाऊ सामाजिक संघटना असून सामाजिक आंदोलनासाठी साथ द्यावी असे आवाहन शेवटी इंजि.

चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश महासचिव रोहिदास बनसोडे (परळी) यांनीही यावेळी आपल्या प्रभावी भाषणातून गुरु रविदासांच्या परिवर्तनवादी विचारांची मांडणी केली. आपल्याला मिळालेल्या मताच्या अधिकाराचा योग्य वापर करावा असे आवाहन केले. रिपब्लिकन पक्षाचे निवृती हत्तीअंबीरे, नगराध्यक्ष वसंत शिरसकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक गणेशराव रोकडे यांनीही यावेळेस आपले विचार मांडले.

माजी नगराध्यक्ष जालिंदर हत्तीअंबीरे, बाळासाहेब रोकडे, उपनगराध्यक्ष जियाउल्ला खान, नगरसेवक अजिमभाई, शेख चाऊस, असदखान पठाण, बालाजीराव फुलपगार, धोंडीबा टोम्पे, बाजीराव चव्हाण आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन संदिप कांबळे यांनी केले तर आकाश चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर टोम्पे, दिलीप चव्हाण, शिवाजी वाघमारे, माधव फुलपगार, विष्णू वाघमोडे, निखिल फुलपगार, दिलीप टोम्पे, नरहरी टोम्पे, गंगाधर गायकवाड, भानुदास टोम्पे, पप्पू हिवरे, गजानन टोम्पे, नवनाथ नरहिरे, संभाजी कांबळे, मोतीराम गायकवाड, केशव फुलपगार, गणेश माने, गोविंद जाधव, रामेश्वर चांदणे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!