चोरट्यांनी चोरट्याचा खून केला; प्रेत सडलेल्या अवस्थेत सापडले

नांदेड(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालकाचा मृतदेह रेल्वे रुळांजवळ कामठा परिसरात आढळल्यानंतर गुन्हेगारांनी गुन्हागाराला मारुन टाकले ही बाब सिध्द झाली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दि.5 फेबु्रवारी रोजी विष्णु तेलंगे हा अल्पवयीन बालक गायब असल्याची तक्रार आल्यानंतर त्या संदर्भाने अल्पवयीन बालकाला पळवून नेण्यासंदर्भाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज 14 फेबु्रवारी रोजी एक अत्यंत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कामठा परिसरातील रेल्वे रुळांजवळ आढळला. सुरूवातीला ती हद्द कोणत्या पोलीस ठाण्याची याच्यावरही जोरदार चर्चा झाली. पण नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अगोदरच बालकाला पळविल्याचा गुन्हा दाखल होता. म्हणून पुढील कायदेशीर प्रक्रिया नांदेड ग्रामीण पोलीसांनी पुर्ण केली. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सापडलेले आणि सडलेले प्रेत विष्णु तेलंगे या अल्पवयीन बालकाचे आहे. त्याच्याविरुध्द अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक झालेली आहे. पण विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या अधिनियमाप्रमाणे त्याला लगेच जामीन मिळत असे. विष्णु तेलंगे गायब झाल्याची तक्रार 5 फेबु्रवारीला आली असली तरी तो 3 किंवा 4 फेबु्रवारीपासून गायब होता असे सांगितले जात आहे आणि आज त्याचे प्रेत सापडले म्हणजे त्याचा खून करण्यात आला हे सुध्दा सिध्द झाले कारण त्याच्या शरिरावर तिक्ष्ण हत्याराने वार केलेल्या खूना सापडलेल्या आहेत. आमच्या खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णु तेलंगेच्या चोरट्या साथीदारांनीच त्याचा खून केला आहे आणि ते मारेकरी पोलीसांच्या ताब्यात आहेत. पण पोलीस प्रशासन स्तरावर आमच्या माहितीला कोेणी दुजोरा दिलेला नाही. पण एक बाब नक्कीच चोरट्यांनी चोरट्याला संपविले असे आम्ही म्हटले तर त्यात चुकीचे काही नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!