नांदेड(प्रतिनिधी)-सिडको मोंढा भागातील रस्ता हा तुटलेल्या अवस्थेत आहे. तेथे होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका दिव्यांग पोलीस उपनिरिक्षकाने नांदेड दक्षीणचे आमदार यांना पत्र देवून दुरूस्तीची मागणी केली आहे. या पत्रासोबत त्या भागात राहणाऱ्या जवळपास 100 लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
नांदेड जिल्हा पोलीस दलातील दिव्यांग पोलीस उपनिरिक्षक सुर्यभान दिगंबरराव कागणे हे राज अपार्टमेंटमध्ये सिडको मोंढा भागात राहतात. त्यांचे कुटूंब तेथेच वास्तव्य करते. एक दुर्घटनेत त्यांचे दोन्ही पाय निकामी झालेले आहेत. दिव्यांग स्कुटीवर ते कार्यालयात येतात आणि घरी जातात.
महानगरपालिका नांदेडच्यावतीने या भागातील सर्व रस्ते खोदून ड्रेनेज पाईप टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्ते अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. यावरून जाणाऱ्या-येण्याऱ्या दुचाकी गाड्या घसरतात आणि लोकांना अपघाताला सामोरे जावे लागते. या ठिकाणीच नालंदा इंग्लीश हायस्कुल आहे. यात सुध्दा दहावी पर्यंतचे विद्यार्थी येतात-जातात. पण या वस्त्यांच्या खोदकामामुळे सर्वच वाहतुक ठप होते.
या भागात पाण्याची पाईपलाईन आहे. परंतू अद्याप नळाला पाणी येत नाही. रस्ते बरोबर नाहीत, नळाला पाणी नाही तरी पण नळपट्टी आणि घरपट्टी यांची बिले मात्र नियमित येतात. प्राप्त माहितीनुसार अजून 80 टक्के काम होणे बाकी आहे. या भागात होणाऱ्या दुरव्यवस्थेसाठी तात्काळ या कामांना लवकर करून घेण्याची गरज आहे अशी विनंती या अर्जात केली आहे. या अर्जाची एक प्रत महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. या अर्जासोबत जवळपास 100 लोकांनी या अर्जाला पाठींबा देण्यासाठी म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत.