चार आमदार मिळून अशोक घोरबांडला वाचविण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून देत आहेत काय?- प्रा.राजू सोनसळे

नांदेड(प्रतिनिधी)-सध्याचे दक्षीणचे आमदार ईतर आमदारांसोबत मिळून अशोक घोरबांडने त्यांना आरोपी होण्यापासून वाचवल्याची परतफेड त्यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी करून देवून करणार आहे काय? असा प्रश्न रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.राजू सोनसळे यांनी उपस्थित केला आहे.
आज बोलावलेल्या पत्रकार परिषदेत प्रा.राजु सोनसळे यांच्या सोबत प्रतिक मोरे, राहुल चिखलीकर हेही उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, परवा 6 फेबु्रवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नांदेड दौऱ्यावर आले असतांना आमदार हेमंत पाटील यांच्या शेतात आणि इतर ठिकाणी निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी भेट घेतल्याचे फोटो आणि व्हिडीओ सामाजिक संकेतस्थळावर व्हायरल झाले आहेत. याबाबत एक उदाहरण देतांना प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले की, मस्साजोग येथील देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांचे फोटो राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत व्हायरल झाल्यानंतर त्यांना पालकमंत्री पद दिले गेले नाही. याचा उल्लेख केला. वाल्मीक कराडच्या फोटोची बीड जिल्ह्यात बातमी झाली. पण नांदेडमध्ये निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड हे उपमुख्यमंत्र्यांना भेटतात त्या फोटो आणि व्हिडीओची बातमी झाली नाही असाही उल्लेख केला.
बोंढार येथील अक्षय भालेराव खून प्रकरणात आताचे दक्षीणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्यावर सुध्दा आरोप होता की ते त्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे आणि इतर आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप झाला होता. त्यावेळी नांदेड ग्रामीण या पोलीस ठाण्यात अशोक घोरबांड हे पोलीस निरिक्षक होते. अक्षय भालेराव खून प्रकरणात त्यांचे नाव वाचविल्याबद्दलचा परतावा किंबहुना परतफेड आनंदराव बोंढारकर हे इतर तीन आमदारांची मदत घेवून अशोक घोरबांडला मदत करत आहेत काय? असा प्रश्न उपस्थित केला आणि असे आमदार करत असतील तर ती बाब कायद्याची हत्या आहे. परभणी प्रकरणात सुर्यवंशीला मारहाण करण्याचा मुख्य आरोप अशोक घोरबांड यांच्यावर आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक घोरबांडला विधानसभा सभागृहात निलंबित केले होत. कोणताही निलंबित अधिकारी त्याच्या नियुक्तीच्या ठिकाणी मुख्यालयात हजेरी द्यावा अशी पोलीस नियमावली आहे. पण अशोक घोरबांड नांदेडला हजेरी देत असेल तर ही बाब सुध्दा कायद्याच्या दृष्टीकोणातून चुक असल्याचे प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले. आमदारांनी अशोक घोरबांडला मदत केली तर रिपब्लिकन सेनेच्यावतीने त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची तयारी आम्ही करणार आहोत असे प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले. नांदेडच्या पोलीस अधिक्षकांच्या शेजारी उभे राहुन सुध्दा अशोक घोरबांड उपमुख्यमंत्र्यांना बोलत आहेत ही घटना सुध्दा निंदनीय असल्याचे प्रा.राजू सोनसळे यांनी सांगितले.
आ.हेमंत पाटील हे ऍट्रॉसिटी प्रकरणात फरार आरोपी आहेत. अद्याप त्यांनी कोणत्याही न्यायालयातून जामीन घेतलेला नाही. अशा परिस्थितीतल्या व्यक्तीने अशोक घोरबांडला मदत करून काय साध्य करणार आहेत असा प्रश्न सुध्दा प्रा.राजू सोनसळे यांनी उपस्थित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!