नांदेड(प्रतिनिधी)-76 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त आज प्रशासनाने सकाळी 6 वाजल्यापासून पोलीस मुख्यालय मैदानावर हजर असलेल्या लहान-लहान बालिकांच्या लेझीम पथकाला ऐनवेळी त्यांच्या प्रदर्शनापासून रोखले. लहान-लहान बालिका अत्यंत हिरमुसल्या मनाने परत गेल्या.
आज 76 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर दिमाखात पार पडला. या प्रसंगी कवायत मैदानावर केंद्रीय सुरक्षा बल, पोलीस विभागाची अनेक पथके, गृहरक्षक दल, एनसीसी, सगररोळी सैनिकी विद्यालय यांच्यासह प्रशासनाच्या विविध विभागातील चित्र रथांचा समावेश होता. यात एक बालिकांचे लेझीम पथक सुध्दा होते. जवळपास 40 पथके होती जी आपल्या कामाचे प्रदर्शन येथे करणार होती.
याप्रसंगी महात्मा फुले हायस्कुलच्यावतीने सुध्दा लहान-लहान बालिकांचा जवळपास 50 जणांचा समुह लेझीमसह तेथे हजर होता. रांगेमध्ये सर्वात शेवटचा नंबर त्यांचा दिसत होता. पण कवायत सुरू झाल्यावर त्यांना पुढे येवू दिले नाही. यानंतर पत्रकारांनी त्या पथकातील बालिका आणि शिक्षक यांची भेट घेतली असतांना शिक्षक असलेले कौठकर सांगत होते की, आमच्या शिक्षण संस्थेचे सचिव डी.पी.सावंत यांना निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी लेझीम पथक पाठविण्यास सांगितले होते. काल दि.25 जानेवारी रोजी आम्ही जाऊन वडदकरांना भेटलो आणि आज सकाळी येण्यास त्यांनी सांगितले. आज जेंव्हा हे बालिकांचे पथक सकाळी 6 वाजता पोलीस कवायत मैदानावर हजर झाले तेंव्हा त्यांना सादरीकरणाच्या शेवटच्या क्रमांकावर उभे राहिलेले आम्ही सुध्दा पाहिले. परंतू त्यांना कवायतीत प्रवेश मिळाला नाही.
याबद्दल बोलतांना त्या पथकातील बालिका अत्यंत हिरमुसल्या होत्या. तेंव्हा कलाकार तथा पत्रकार विजय जोशी यांनी त्या बालिकांना आश्वासन दिले की, बेटा माझे अनेक कार्यक्रम होत असतात. पुढच्या एका कार्यक्रमात तुमच्या लेझीम पथकाला मी नक्कीच संधी देईल. प्रश्न असा आहे की, जवळपास 40 पथके त्या कार्यक्रमात सहभागी झाली होती. एक पथक जास्तीचे झाले असते तर जिल्हा प्रशासनाला त्यामुळे काय फरक पडणार होता. कमीत कमी त्या बालिकांचे हिरमुसलेले चेहरे प्रजासत्ताक दिनी तरी दिसले नसते.
या कार्यक्रमात शिक्षण संस्थेचे प्रमुख खा.अशोक चव्हाण सुध्दा हजर होते. त्यांना या बद्दल विचारणा केली असता मला या बद्दल काही माहिती नाही असे राजकीय उत्तर देवून त्यांनी वेळ काढला. पण त्या लहान-लहान बालिकांचे चेहरे एवढे वाईट झाले होते की, ते पाहुन कोणालाही वाईट वाटेल.