नांदेड- येथील युवा साहित्यिक सोनू दरेगावकर लिखित, “जगणं दुनियादारीचं” या मराठी पुस्तकाचे २१ जानेवारी रोजी दुबईमध्ये प्रकाशन झाले. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन यशदा पुणेचे अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व स्वयंदीप प्रकाशन, पुणे यांच्या विद्यमाने करण्यात आले. स्वयंदीप फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने दरवर्षी डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून दुबईमध्ये लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम दुबईमध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष दुबईमधील प्रसिद्ध उद्योजक डॉ. शेख जाशीम गेलान चेअरमन ऑईल अँड गॅस ग्रुप ऑफ गेलान यांची उपस्थिती होती. याच कार्यक्रमात “जगणं दुनियादारीचं” या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी डॉ. बबन जोगदंड, सहाय्यक पोलीस आयुक्त राजीव मोरे, उद्योजक दीपक ढोले पाटील,इंजि. विवेक मवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. जाशीम यांनी या कवितासंग्रहातील कविता या निसर्ग आणि मानव यांना जोडणाऱ्या कविता असून मानवी उत्थानाचा विचार या पुस्तकात मांडला आहे, असे प्रतिपादन केले. या पुस्तकाबद्दल डॉ. बबन जोगदंड म्हणाले, जीवन जगताना माणसाला अनेक अनुभव येत असतात. या अनुभवाच्या शिदोरीवरच त्याची पुढची वाटचाल चालू असते. त्यातील भले-बुरे अनुभव कधी मनाला भावतात, काही खूप शिकवून जातात तर कधी त्याच्या जखमा होतात. तसं पाहिलं तर जीवन एक संघर्ष आहे. या संघर्षातूनच पुढे आलेला सोनू दरेगावकर हा कवी अत्यंत विनम्र, संवेदनशील, हळवे मन असलेला आणि इतरांप्रति करुणा असलेला. आपल्या जीवनामध्ये आलेले अनेक अनुभव तो शब्दबद्ध करतो आणि तो अत्यंत कमी शब्दात मोठा आशय मांडतो. चार ओळींमध्ये आपल्या भावना ( चारोळी ) मांडून समाजप्रबोधनाचा प्रयत्न करतो. त्यांनी लिहिलेल्या चारोळ्या या विविधाअंगी आहेत. यामध्ये त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला आहे. भूक, गरिबी, दारिद्र्य, अंधश्रद्धा, प्रेम, करुणा, माया, ममत्व, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, कष्ट, शेतकरी आई, बाप असे अनेक विषय त्यांनी यामध्ये रेखाटले आहेत. अत्यंत भावस्पर्शी, मनाला संवेदनशील करणाऱ्या अशा या चारोळ्या आहेत. त्यांनी आपल्या या संग्रहाच्या सुरुवातीलाच “माणसात वाद नाही, संवाद हवा !
बुद्धाने प्रेमाने जग जिंकावे असे सांगितले आहे तसेच माणसाने माणसासारखे वागावे असाही उपद्देश केला आहे. या दृष्टीने सोनू दरेगावकर यांची वरील टॅगलाईन फार महत्त्वपूर्ण वाटते. या काव्यसंग्रहाची मांडणी चित्रस्वरूपात केल्यामुळे या चारोळ्याचे एक वेगळेपण ठरते. चित्र फार बोलके असतात, त्यामुळे चारोळ्यांचा व हे चित्र बरेच काही सांगून जाते. हा एक आगळावेगळा मानवी प्रबोधनाचा अनोखा प्रयोग दरेगावकर यांनी केला आहे .तो मानवी कल्याणाच्या उत्कर्षाच्या पायरीतील मैलाचा दगड ठरेल, अशी आशा डॉ. बबन जोगदंड यांनी व्यक्त केली. या प्रकाशन सोहळ्यात मोठ्या संख्येने भारतीय नागरिकांची देखील उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेखा मवाडे यांनी केले.