नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे यांच्याविरुध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 17 हजारांची लाच घेतांना रचलेल्या सापळ्यात ते दोघे अडकले आहेत. ही सापळा कार्यवाही वैध वाळू व्यवसायीकाने केली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ताब्यात घेतले आहे.
दि.20 जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तक्रारदार याचे हायवा वाहन आहे. या वाहनात तो कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यांवरून ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतुक करतो. त्या वाळू वाहतुकीच्यावेळी पोलीस ठाणे कुंडलवाडी जि.नांदेड यांच्या हद्दीतून वाळू वाहतुक करतांना पोलीसांनी कोणतीही कार्यवाही करू नये यासाठी पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे यांनी स्वत:साठी 10 हजार आणि कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे यांच्यासाठी 15 हजार अशी 25 हजार रुपयांची लाच मागणी केली. या लाच मागणीची पडताळणी 21, 22 आणि 23 जानेवारी करण्यात आली. त्यात तडजोड झाली. तडजोडीमध्ये नारायण शिंदसाठी 7 हजार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत नागरगोजे यांच्यासाठी 10 हजार असे 17 हजार रुपये देण्याचे ठरले आणि आज भागवत नागरगोजे यांनी लाचेचे पैसे पोलीस उपनिरिक्षक नारायण शिंदे यांच्याकडे देण्यास सांगितले आणि ती लाचेची रक्कम 17 हजार रुपये नारायण शिंदे यांनी पंचासमक्ष स्वत: स्विकारली आणि त्यानंतर लगेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ए.पी.आय. आणि पी.एस.आय. दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलीस विभाग नेहमीच सांगते की, आमचा वाळूच्या व्यवसायासोबत काही संबंध नाही. मग आज झालेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा प्रकार वाळूच्या व्यवसायाशीच संबंधीत आहे. पोलीस विभागाचे अनेक कलेक्टर जिल्हाभरातील विविध वाळू घाटावर आपले साम्राज्य गाजवितात. काही जण तर आपल्या स्वत: च्या महागाड्या चार चाकी गाडीत अधिकार नसतांना सुध्दा वाळूच्या गाड्या ज्या रस्त्याने येतात. त्या रस्त्यावर आपली गाडी उभी करून वाळू वाहतुकीच्या अवैध व्यवसायीकांकडून वसुली करतात. ही वसुली कशासाठी केली जाते. ज्या व्यवसायाशी संबंधच नाही. मग त्यासाठी कलेक्टर नेमण्यात कसे आले. याचाही शोध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज झालेल्या प्रकरणानंतर घ्यायला हवा. तरच वाळू या व्यवसायाशी पोलीसांचा संबंध आहे की, नाही ही तरी स्पष्टता समोर येईल.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भागवत तुकाराम नागरगोजे (44) मुळ राहणार होनीहिप्परगा ता.उदगीर जि.लातूर आणि पोलीस उपनिरिक्षक नारायण मोतराव शिंदे (36) मुळ रा.कोकर कॉलनी मानवत जि.परभणी यांच्याविरुध्द वृत्तलिहिपर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक संदीप पालवे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.संजय तुंगार, पोलीस उपअधिक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रिती जाधव, पोलीस अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले, ईश्र्वर जाधव यांनी ही कार्यवाही पुर्ण केली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक असतांना प्रविण दक्षीत यांनी अशीही सुचना केली होती की, जो व्यक्ती लाच प्रकरणात अडकला आहे त्या व्यक्तीची नेमणुक करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याची सुध्दा चौकशी व्हावी. कारण त्याने घेतलेली लाच ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी घेतली आहे का याची स्पष्टता होईल. आजपर्यंत झालेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागांच्या कार्यवाहींमध्ये अशीच चौकशी झाल्याचे कधी ऐकीवात आले नाही. आता तरी येईल अशी अपेक्षा करू या.