नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात घडलेल्या 12 वर्ष वयाच्या अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणात 65 वर्षीय व्यक्तीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी 20 वर्ष सक्तमजुरी आणि जवळपास 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
नांदेड शहरात राहणाऱ्या 12 वर्षीय वयाच्या एका अल्पवयीन बालिकेवर 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी अत्याचार झाला. ही बालिका आपल्या घरातून काही सामान आणण्यासाठी किराणा दुकानावर जात असतांना कचरु नरहरी सरोदे (65) या व्यक्तीने तिला वरच्या मजल्यावरुन माझे पैसांचे पाकिट आण म्हणून तिला वर पाठविले. कचरू सरोदे त्या बालिकेच्या मागेच गेला आणि वेगवेगळ्या प्रकारे तिच्या अंगाला झटत होता. घडलेला प्रकार बालिकेने आपल्या आईला सांगितल्यानंतर 16 सप्टेंबर 2023 रोजी याची तक्रार देण्यात आली आणि त्यानुसार शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 376(3), 376(अ ब), 506 सोबत पोक्सो कायद्याच्या कलम 4,6 आणि 8 नुसार गुन्हा क्रमांक 308/2023 दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सध्या मनाठा येथे असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक उमाकांत पुणे यांनी केला. प्रकरणातील आरोपी कचरु नरहरी सरोदे यास अटक करून सखोल तपासानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात याप्रकरणी एकूण 10 साक्षीदारांनी सरकार पक्षाच्यावतीने आपले जबाब नोंदवले. बचाव पक्षाने सुध्दा एका साक्षीदाराची तपासणी केली. उपलब्ध असलेल्या पुराव्याच्या आधारावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कचरू नरहरी सरोदेला कलम 376(3), 376(अ,ब) साठी 20 वर्ष सक्तमजुरी आणि रोख दंड कलम 506 साठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि रोख दंड ठोठावला. पोक्सो कलम 4(2), 5(एम) साठी प्रत्येकी 20 वर्ष सक्तमजुरी रोख दंड ठोठावला. कलम 8 साठी 3 वर्ष सक्तमजुरी आणि रोख दंड ठोठावला. असा एकूण जवळपास 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. या सर्व शिक्षा कचरू नरहरी सरोदेला एकत्रीत भोगायच्या आहेत. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने उत्कृष्ट सादरीकरण ऍड. एम.ए.बत्तुल्ला(डांगे) यांनी केले. पोलीस ठाणे शिवाजीनगर येथील पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आर.टी.ढोले या ंनी पैरवी अधिकाऱ्याची भुमिका बजावली.