गाडी क्रमांक ०७९७० काचीगुडा ते पूर्णा डेमू रेल्वेची कहानी फार मजेशिर आहे. ही वेळखाऊ ट्रेन आहे. ज्याला कांहीही काम नाही त्यानेच या गाडीने प्रवास करावा अशी ही भारतीय लोकांच्या वेळेच्या अपव्ययाची ट्रेन आहे. ही ट्रेन म्हणजे भारताच्या प्रगतीचे नव्हे तर अवनतीचे एक प्रतिक आहे. कुणाच्या सुपिक डोक्यातून ही कल्पना निघाली त्याचा धिक्कार करावा तितके कमी आहे.
ही रेल्वे आठवड्यातून फक्त एक दिवस शनिवारी धावते ! शनिवारी दुपारी १२ वाजता हैद्राबाद मधील काचीगुडा या ठिकाणापासून या गाडीची सुरुवात होते. टाईम टेबल प्रमाणे अचूक चालली तर ही गाडी रात्री ०९.३० वाजता पूर्णा येथे पोहचते. प्रत्यक्षात वेळेच्या बाबतीत या गाडीची कहानी फार मजेशिर आहे. ही पॅसेंजर ट्रेन असल्याने हिला कांही वेळेचे बंधन नाही असे दिसून येते.
सर्व स्टेशनला एक दोन मिनीट थांबत निघालेली ही रेल्वे गाडी कधीच वेळेवर कोणत्याही स्टेशनला पोहचत नाही. नांदेडला येण्याची या गाडीची वेळ रात्रीचे ०८.३० आहे. त्या दिवशी शनिवारी ४ जानेवारी रोजी मला मिरजला जायचे होते. नागपूर – कोल्हापूर या गाडीचे पंधरा दिवस अगोदर एसीचे तिकीट बुक केले होते. ही गाडी मला रात्री ११ वाजता पूर्णा येथून पकडायची होती.
रात्री ९ वाजता मी नांदेडच्या फलाट क्रमांक चार वर गेलो. तिथे रेल्वे कार्यालयाच्या तिकीट खिडक्या बंद झाल्या होत्या. पूर्णापर्यंतचे तिकीट घेण्यासाठी मला फलाट क्रमांक एक वर जावे लागले; तेंव्हा गाडी क्रमांक ०७९७० ची घोषणा झाली. साडे आठची ही गाडी साडे नऊ वाजता फलाट क्रमांक चार वर येणार होती.
मी विचार केला. पूर्णाला जाण्यासाठी फक्त अर्धा तास लागतो. करेक्ट साडे नऊला निघाली तर दहा वाजता पूर्णाला पोहचेन. एक तास आधी गेलेले बरे असे म्हणून मी तिकीट काढून परत फलाट क्र. चार वर गेलो. साडे नऊ वाजता ही डेमू आली. गाडी नव्वद टक्के रिकामी होती. बरे झाले, एकदम मोकळे बसून जाता येते म्हणून या गाडीत बसलो. दहा पंधरा मिनिटे झाले तरी गाडी सुटत नव्हती. माझी चुळबूळ वाढली. काय करावे ? उतरुन परत फलाट क्रमांक एक वर जावे काय ? या गाडीबद्दल लोकही उलट सुलट बोलू लागले. या गाडीचे कांही खरे नाही. हिला वेळेचे कांही बंधन नाही.
हे सुविचार ऐकून मी बॅग घेऊन गाडीच्या खाली उतरलो. शेवटच्या डब्ब्याजवळ आलो गार्डला विचारावे म्हणून तर शिटी वाजली व गाडी हालली. काय करावे सुचत नव्हते. परत बॅग घेऊन फलाट क्र. एक वर जाण्यापेक्षा बसावे ह्याच गाडीत, थोडा तर प्रवास आहे असे म्हणून पळत या गाडीत शिरण्याचा प्रयत्न केला तर पाय घसरुन गाडीतच धप्पकन पडलो. तसाच उठून सिटवर बसलो तर पाठ लचकली होती.
डबा पूर्ण रिकामा होता. मोठ्या लांबलचक सिटवर पाठ चोळत पडून राहिलो. पाच मिनीटात वानेगाव स्टेशन आले. गाडी थांबली व लगेच निघाली. खूप बरे वाटले. आता लगेच पूर्णाला जाईन याचा आनंद झाला. पाठदुखीचा त्रास विसरुन मी पुन्हा पहुडलो सिटवर. दोळे मिटले तर पुन्हा गाडी थांबली. लिंबगाव आले म्हणून कांही प्रवासी खाली उतरले. मी देखिल खाली उतरलो.
रिकाम्या डब्ब्यात बसण्यापेक्षा माणसात जाऊन बसावे म्हणून मी समोरच्या डब्ब्यात गेलो. तिथे दहा बारा लोक होते. त्यातील कांही जणांना अकोल्याला जायचे होते म्हणून ते चुळबूळ करु लागले. त्यांची अकराची गाडी होती. लिंबगावहून गाडी हालत नव्हती. माझीही चुळबूळ वाढली. माझीही अकराची गाडी होती. घड्याळात अकरा वाजले होते. आता काय करावे ? स्टेशनवर स्मशान शांतता पसरली होती. हाक ना बोंब !
तेवढ्यात मोबाईलवर मला रेल्वेचा एक मॅसेज आला. नागपूर कोल्हापूर ही गाडी अर्धा तास उशिरा येणार होती. मी त्या गाडीचा रनिंग लाईव्ह स्टेटस चेक केला. गाडीने हिंगोली सोडले होते. चला, साडे अकरा पर्यंत आपण पूर्णाला गेलो तर कोल्हापूर गाडी भेटते म्हणून थोडे समाधान वाटले पण ही डेमू कांही केल्या लिंबगाव सोडायला तयार नव्हती. मागून नांदेडहून राज्यराणी एक्सप्रेस व अन्य दोन गाड्या धडधडत निघून गेल्या पण या डेमूला का थांबऊन ठेवले ते कळत नव्हते. डबल ट्रॅक होऊनही गाड्या अशा का थांबऊन ठेवतात हे एक न उलगडणारे कोडे आहे.
सव्वा अकरा वाजता गाडी हालली. चला, आता लगेच पूर्णा येईल असे वाटले. कोल्हापूर गाडी भेटेल की नाही अशी तळमळ लागली. बघता बघता चुडावा आले. येथे परत आठ मिनिटे गाडी थांबली. अखेर चुडाव्यावरुन गाडी सुटली व गाडीने वेग घेतला आणि कांही क्षणात पूर्णा आले पण सरळ स्टेशनमध्ये न जाता गाडी आऊटरला थांबली. कोल्हापूर गाडीचे परत रनिंग स्टेटस चेक केले तर गाडी पूर्णापर्यंत आली होती पण डेमू कांही केल्या स्टेशनमध्ये शिरत नव्हती. स्थानिक प्रवासी उतरुन जात होते पण एवढ्या रात्री खाली उतरण्याची माझी हिंमत होत नव्हती. एक दिड किलोमीटर स्टेशन लांब आहे असे लोक बोलत होते.
जाऊ द्या आता मिरजला जाऊ शकत नाही म्हणून मी निवांत सीटवर जाऊन बसलो. रात्रीचे बारा वाजले होते. कोल्हापूर गाडी फलाट क्र. एक वर येणार असे स्टेटस दाखवित होते तर थोड्यावेळाने डेमू हालली व सरळ फलाट क्रमांक एक वर येऊन आदळली. त्यामुळे बऱ्याच जणांचा गोंधळ उडाला. मी बॅग सावरत कसे बसे स्टेशन मास्टरची कॅबीन गाठली.
कोल्हापूर गाडी गेली का म्हणून विचारलो. नहीं, अभी आ रही है । असे ऐकून माझा जीव भांड्यात पडला. यहां पर ही आ रही है क्या ? असे मी विचारताच तो मला पाहून हसू लागला. यहां पर कैसे आएगी ? यह डेमू है ना यहां पर !
मी – फिर कहां आएगी ?
स्टेशन मास्टर – अनाऊन्समेंट होगा, उस पर ध्यान दो । जाओ, बाहर बैठ कर इंतजार करो !
चुळबूळत मी बॅग घेऊन बेंचवर येऊन बसलो. मन राहवत नव्हते म्हणून दिसेल त्याला विचारत होतो, कोल्हापूर कहां पर आएगी ? एक रेल्वे कर्मचारी म्हणाला, दो नही तो चार पर आएगी । ब्रिज पर जाकर खडे हो जाओ, अभी अनाऊन्समेंट होगी ।
मी बॅग घेऊन पायऱ्या चढून ब्रिजवर जाऊन उभा राहिलो. तोपर्यंत इंजिन येऊन डेमूला लागले व डेमू आले त्या मार्गावर परत फिरली. मला वाटले आता फलाट क्र. एक रिकामे झाले की तिथे कोल्हापूर गाडी लागेल. मी परत फलाट क्र. एक वर आलो. गाडीची वाट पाहू लागलो.
फलाट क्र. चार वरुन कांही जण एक वर आले होते. त्यातील एक सोबत आलेला डेमूतील प्रवासी होता. त्याला अकोला जायचे होते म्हणून अनाऊन्समेंटची वाट पाहत तो फलाट क्र. चार वर गेला तर त्याला सांगण्यात आले की अकोला गाडी एक वर येईल. अनाऊन्समेंट का होत नाही असे तो म्हणाला तर मी देखिल तेच म्हणालो, अनाऊन्समेंट कधी होईल ? तो म्हणाला, तुम्हाला कोठे जायचे आहे ? मी कोल्हापूर म्हणताच तो म्हणाला, तुमची गाडी फलाट क्र. चारवर येऊन थांबली आहे. जा लवकर, भेटू शकते.
मी सामान आवरीत धावत पळत फलाट क्र. चार वर पोहचलो. भेटेल त्या डब्ब्यात शिरावे असा विचार केला पण गाडीच्या बाहेर उतरुन बरेच प्रवासी निवांत थांबले होते. मी स्टेटस पाहून कोच पोझीशन चेक केली तर त्याप्रमाणे एकही डबा लागला नव्हता. रेल्वेचा हा घोळ पाहून प्रचंड चिड येत होती.
बी टू हा डबा फार पुढे लागला होता. तिथपर्यंत जायला मला भरपूर वेळ लागला. एसीचे सर्व डब्बे आतून लाऊन घेतलेले होते. मी दरवाजे बडवित राहिलो. कुणीही दार काढत नव्हते. एका डब्ब्याच्या बाहेर टीसी थांबला होता. त्याने सिट नंबर विचारल्यावर मी साठ म्हणताच चलो जल्दी से अंदर असे म्हणून टीसीने दार उघडले.
मी घाई गडबडीतच डब्ब्यात शिरलो तर डब्ब्यात सामसूम होती. माझ्या लोअर सिटवर एक जाडजूड महिला झोपली होती. तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने कांहीही प्रतिसाद दिला नाही. मी पळत जाऊन टीसीला बोलाऊन आणले तर टीसी म्हणाला, औरत है, मै क्या करु ? देखो तुम्हारा तुम ! असे म्हणून टीसी निघून गेला. ईथे नियम, कायदा, कानून सारे कांही भींतीला टांगलेले ! शेवटपर्यंत अनाऊन्समेंट झालीच नाही.
डोळ्यात झोप मावत नव्हती. अंग फार दुखत होते. पाठीतून कळा निघत होत्या. साडेबारा वाजून गेले होते. दुसरी एक महिला म्हणाली, उसे सोने दो. तुम उपर जा कर सो जाओ !
हक्काची सीट सोडून मी कसाबसा वर चढलो. आरपीएफ जवानाला बोलाऊन आणावे असे वाटत होते पण ते देखिल कुठे दिसत नव्हते. आता गाडी केंव्हाही सुटो असे म्हणून मी झोपी गेलो. ही गाडी एक दिड तास उशिराने धावत होती. छोटे मियां तो छोटे मियां, बडे मियां सुभान अल्ला असे म्हणण्याची वेळ आली होती. डेमू प्रमाणेच ही सुपर फास्ट गाडीही उशिरा धावत होती.
रेल्वे टाईम टेबल प्रमाणे का धावत नाहित ? जंक्शनच्या ठिकाणी अर्धा पाऊन तास का थांबतात. पॅसेंजर गाडीलाच का थांबऊन ठेवतात ? मोदी कृपेने पॅसेंजर आणि एक्सप्रेसचे तिकीट दर सारखेच ठेवण्यात आले आहे, पॅसेंजरला वेळापत्रकाचे पालन का केले जात नाही ?
डेमू वेळेवर धावली तर काचीगुडा ते पूर्णा जाण्यास साडे नऊ तास लागतात. एक्सप्रेसने हे अंतर चार ते साडे चार तासात कापता येऊ शकते. सर्व पॅसेंजर्स गाड्या आता एक्सप्रेस झाल्या आहेत असे रेल्वे विभाग सांगत आहे व भाडे देखिल एक्सप्रेसचे घेण्यात येत आहे तर डेमूला काचीगुडा ते पूर्णा यायला साडेनऊ तास कसे काय लागतात ? सर्व स्टेशनला ती थांबते तर एक दिड तास जास्तीचा धरला तर ती पाच ते साडे पाच तासात पुर्ण्याला यायला पाहिजे !
याचा अर्थ भारतीय लोकांकडे भरपूर वेळ आहे व ते समंजस आहेत. त्यांना वेळेचे कांही देणे घेणे नाही. चार तासाच्या प्रवासाला ते आठ तास देतात. रेल्वेच्या डब्ब्यात स्वतःला जनावरासारखे कोंबून घेऊन किती तरी तास ते वाया घालवित असतात. यामुळे त्यांचीच नाही तर देशाची क्रयशक्ती वाया जात असते. याचा जाब राज्यकर्त्यांना ते कधीही विचारित नाहित. अंधेर नगरी चौपट राज अशीच एकंदरीत परिस्थिती या देशात आहे.
जपानचे प्रधानमंत्री सिबे सोरंज हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. आपल्या प्रधानमंत्र्यांनी त्यांना वाराणसीला नेले. तेथे गंगा नदीवर नैऊन आरती कशी होते ते दाखविले. एक दिड तास ती भव्य दिव्य आरती पाहून जपानचे प्रधानमंत्री भारताच्या प्रधानमंत्र्यांना म्हणाले की, तुमच्याकडे भरपूर वेळ आहे. नदीवरील आरतीसाठी तुम्ही तास दिड तास देत असाल तर तुम्हाला बुलेट ट्रेनची आवश्यकता नाही. ज्यांना वेळेची बचत करायची असते त्यांच्यासाठी बुलेट ट्रेन आहे.
आमच्या राज्यकर्त्यांनी निवडणुकीत बुलेट ट्रेनची भरपूर आश्वासने दिली पण प्रत्यक्षात ती गावोगावी येऊ शकली नाही. आज वेगवान रेल्वेच्या बाबतीत चीन हे राष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आम्ही चीनचा द्वेष करतो. चीनी वस्तूंवर बहिष्कार टाका अशी भाषणे निवडणुकीत देतो पण चीनने सर्व बाबतीत जी प्रगती आणि गती प्राप्त केली त्याकडे दुर्लक्ष करतो. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है अशी भाषणे ठोकून निवडणुकीत मते मिळवितोत. सेफ असण्यासाठी जी साधन सुविधा द्यायची असते त्या बाबतीत भारत पिछाडीवर आहे. बुवा बापू अम्मा टम्मा या बाबतीत मात्र भारत आघाडीवर आहे. गायीच्या शेणातील गहू दळून त्या पिठाची चपाती करुन खाल्ल्यास हमखास मुलगा होतो असे सांगणारे बुवा बापू अत्यंत प्रतिष्ठेचे जीवन जगत असतात. आमचे पुढारी त्यांच्या पुढे लोटांगण घालित असतात.
जगातील अती वेगवान रेल्वेंचा विचार केला तर चीनची शांघाय – मागलेन ही रेल्वे ताशी ४६० किलोमीटर या वेगाने धावत असते, म्हणजे विमानापेक्षा अधिक वेगाने ही रेल्वे धावते. याचा अर्थ काचीगुडा ते पूर्णा अशा दोन फेऱ्या ही रेल्वे एका तासात करते. कुठे आमचे साडेनऊ तास आणि कुठे चीनच्या या रेल्वेचे अर्धा तास ? चीनच्या लोकांचे नऊ तास प्रवासाचे वाचत असतील तर या नऊ तासात हे लोक प्रगती करणार नाहित तर काय करतील ?
क्रमांक दोन आणि तीनवर देखिल चीनच्याच रेल्वे धावतात. सी आर हर्मोनी आणि सी आर फक्सींग या दोन चीनी रेल्वे ताशी ३५० किलोमीटर या वेगाने धावतात. म्हणजे नांदेड ते नागपूर हे अंतर त्या रेल्वे एका तासात कापतात. आपली नंदीग्राम एक्सप्रेस नांदेडहून नागपूरला जायला बारा तास लावत असते ! याचा अर्थ, एका तासाच्या प्रवासासाठी आपण आपले महत्वाचे बारा तास वाया घालवित असतो.
जर्मनीची डीबी इंटरसिटी एक्सप्रेस ३ ही रेल्वे जगात चौथ्या क्रमांकावर धावत असते. या गाडीचा वेग ताशी ३५० हून अधिक आहे. फ्रान्सची एस एन सी एफ ते टीजीव्ही ही रेल्वे ताशी ३२० किलोमीटर धावत असते. ती जगात पाचव्या क्रमांकावर आहे, म्हणून फ्रान्स प्रगतीपथावर आहे.
जगातील सहाव्या क्रमांकावर जपानची जेआर शिंकासेन ही रेल्वे आहे, ती तासी ३२० किलोमीटर या वेगाने धावते तर सातव्या क्रमांकावर असलेली मोरोक्को या छोट्या देशाची ओएनसीएफ एआय ही रेल्वे तासी ३१० किलोमीटरने धावत असते. स्पेनची रेनफे एव्हीई १०३ ही जगातील आठव्या क्रमांकाची रेल्वे तासी ३१० या वेगाने धावत असते.
दक्षिण कोरियाची कोरेल केटीएक्स सँन्चीन ही रेल्वे जगात नवव्या क्रमांकावर असून तिचा वेग तासी ३०५ किलोमीटर आहे. जगात दहाव्या क्रमांकावर असलेली ईटालीची ट्रेनिटालिया फ्रेसीअरोसा १००० ही रेल्वे तासी ३०० किलोमीटर या वेगाने धावते. या तुलनेत आपण कुठे आहोत ? आमची ०७९७० ही डेमू आणि चीन जपान ईटलीच्या अतिवेगवान गाड्या यांची तुलनाच होऊ शकत नाही. समोरुन एक ट्रेन येत असेल तर दुसऱ्या ट्रेनला किमान अर्धा तास थांबऊन घेण्यात येते.
गाड्या तासनतास थांबऊन घेणे व धीम्या गतीने धावणे, डब्ब्यात जनावराप्रमाणे एकावर एक बसणे ही भारताची फॅशन झाली आहे. अमित शहा म्हणतात की, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर बोलणे ही फॅशन झाली आहे. ईतक्या वेळेस देवाचे नाव घेतले तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता. देवाचे नाव घेऊन स्वर्ग सुखाची लालसा दाखविणारे आमच्याकडील बेरकी राजकारणी आणि शेकडो किलोमिटरच्या वेगवान गाड्या चालऊन जनतेला खरे स्वर्गीय सुख देणारे चीन, जर्मनी, जापान, स्पेन, फ्रान्स हे देश ! आणि म्हणे आम्ही महासत्ता होणार ? डेमू ट्रेन चालऊन भारत महासत्ता होणार आहे काय ?
*- इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर*
अध्यक्ष, अ. भा. गुरु रविदास समता परिषद. मो. ८५५ ४९९ ५३ २०. नांदेड