मुंबई, : -शिखांचे दहावे गुरुजी गुरू गोविंद सिंग यांनी देशासाठी, आपल्या सर्वांचे रक्षण करण्यासाठी, आपल्या समाजाचे, आपल्या संस्कृतीचे, आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचे बलिदान दिले. आजच्या दिवशी गुरू गोविंद सिंगजी यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या हौताम्यांची आठवण ठेवत प्रधानमंत्री नरेंद्र सिंग यांनी ठरविल्याप्रमाणे आजचा दिवस हा शहीद वीर बाल दिवस म्हणून स्मरणात ठेऊ, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करून त्यांना नमन केले.
वीर बाल दिवसाचे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार विद्या ठाकूर, कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी शक्ती सिंग, संयोजक किरण पाटील, सह संयोजक सुरींदर सिंग पुरी, सह संयोजक राणी द्विवेदी, गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, हजारो पिढ्या आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील आणि त्यांच्या हौतात्म्याची ही कहाणी आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवणे, ही आपली जबाबदारी आहे. या शहीद वीर बाल दिनानिमित्त या दोन साहेबजादे यांना आणि आदरणीय गुरु गोविंद सिंग जी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी नतमस्तक होतो.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आपल्या भाषणात गुरु गोविंद सिंगजी, त्यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंग आणि साहेबजादे फतेह सिंग यांच्या शौर्य तसेच संपूर्ण कुटुंबाच्या त्यागाची माहिती वर्णित केली.