नांदेड (प्रतिनिधी)-भाग्यनगर पोलिसांनी एका विधीसंघर्ष बालकासह एका २५ वर्षीय युवकाला पकडून त्याच्याकडून पाच घरफोड्यामधील १२ लाख ८२ हजार पाचशे रुपयांचे सोने जप्त केले आहे. या चोरट्याने या अगोदर सुध्दा बारा चोर्या केलेल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यनगर पोलिसांनी अभिजित उर्फ अभय देवराव राऊत (२५) रा.बेलानगर, तरोडा खु.नांदेड यास पकडले. या युवकाने या अगोदर बारा चोर्या केल्या होत्या त्यासुध्दा भाग्यनगर पोलिसांनी उघड केल्या होत्या. सध्याच्या परिस्थितीत त्यांनी पाच चोर्या एका विधीसंघर्ष बालकाला सोबत घेवून केल्याची कबुली दिली आहे. घराच्या किचनच्या रुमच्या पाठीमागील विटा काढून घरात प्रवेश केला आणि मोठा ऐवज चोरुन नेला होता. या प्रकारे त्याने एकूण पाच चोर्या केल्याची कबुली दिली आहे. त्यात भाग्यनगर पोलिसांनी १७१ ग्रॅम वजनाचे सहा सोन्याचे लगड जप्त केले आहेत. त्याची किंमत १२ लाख ८२ हजार पाचशे रुपये आहे.
या उत्कृष्ट कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार,अपर पोलीस अधीक्षक खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहायक पोलीस अधीक्षक कृतिका यांनी भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, पोलीस अंमलदार प्रदीप गर्दनमाने, वाडीयार, गजानन किडे, ओमप्रकाश कवडे, सूर्यभान हासे, आणि सायबर विभागाचे राजेंद्र सिटीकर यांचे कौतूक केले आहे.