नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही महिन्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी गाजल्या. सध्या नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणुक त्याच मार्गावर आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सचिव तीन दिवसांपुर्वी नांदेडला आले होते आणि गुप्त बैठक करून परत गेले आहेत. नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुका होणार की, अध्यक्ष लादला जाणार हा प्रश्न महत्वपुर्ण आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनात परिषदेचे सचिव प्रा.सुरेश नाईकवाडे यांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीचे निरिक्षक म्हणून नांदेडला पाठविले होते. नांदेडच्या विश्रामगृहात एक गुप्त बैठक झाली. खरे तर निवडणुक निरिक्षकाने नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्वच सदस्यांना बोलावून निवडणुकीबाबत त्यांची मते जाणून घेणे आवश्यक होते. पण तसे न करता फक्त निवडणुकीच्या अध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधलेले माजी अध्यक्ष गोवर्धन बियाणी, नवीन अध्यक्ष होण्याच्या तयारीत असलेले सुभाष लोणे, संतोष पांडागळे आणि लक्ष्मण भवरे या चारच लोकांना बोलावण्यात आले होते. त्या ठिकाणी झालेल्या चर्चेनंतर गोवर्धन बियाणी, संतोष पांडागळे आणि सुभाष लोणे यांनी एका कागदावर ही सम्मती दिली आहे की, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. पण लक्ष्मण भवरे यांनी असे काही लिहुन दिले नाही अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
खरे तर निवडणुक निरिक्षकाने जिल्हा पत्रकार संघाच्या सर्वच सदस्यांची सर्वसाधारण बैठक आयोजित करून निवडणुकीसंदर्भाने सर्वांची मते जाणून घ्यायला हवी होती. पण तसे घडले नाही. देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकांप्रमाणे गुपचूप हालचालींना आलेला हा वेग जिल्हा मराठी पत्रकार संघामध्ये वेगळीच चर्चा तयार करत आहे. ज्या तिघांनी एस.एम.देशमुख यांचा निर्णय मान्य आहे असे लिहुन दिले आहे. त्यातील कोणता जिंकतो किंवा त्या तिघांपैकी कोणाचे नाव नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून लादले जाते हा रंजक विषय आहे. लक्ष्मण भवरे यांनी काही लिहुन दिले नाही म्हणजे ते आता रेसच्या बाहेर झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही.