नांदेड(प्रतिनिधी)-परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे निलंबित पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांची विभागीय चौकशी आयपीएस अधिकाऱ्याकडे द्यावी अशी मागणी करणारे निवेदन रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड परिक्षेत्र यांना दिले आहे.
10 डिसेंबर 2024 रोजी परभणी येथे विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर परभणीत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलीसांनी बळाचा वापर करून त्या आंदोलनाची हाताळणी केली. त्यात परभणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक अशोक घोरबांड यांनी सोमनाथ सुर्यवंशी या युवकाला पोलीस कोठडीत केलेल्या मारहाणीनंतर ते एमसीआरमध्ये असतांना मारहाणीच्या शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल 6 सदस्यी डॉक्टर टिमने दिला. परभणी येथील वच्छलाबाई मानवते यांच्या डोक्याला, हाताला, व पायाला फॅक्चरसारखा गंभीर स्वरुपाचा मार लागला आहे. तसेच पोलीसांच्या मारहाणीतच सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भाने मुख्यमंत्री यांनी पोलीस निरिक्षक अशोक घोरबांडच्या निलंबनाची घोषणा विधान मंडळाच्या सभागृहात केली. अशोक घोरबांड हे नांदेड जिल्ह्याचे रहिवासी आहेत. त्यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रात नियमाप्रमाणे विहित सेवा पुर्ण केेलेली आहे. तेंव्हा त्यांच्या प्रकरणाची योग्य व स्पष्ट चौकशी व्हावी यासाठी त्यांच्या विभागीय चौकशी करण्याचे अधिकार आयपीएस असलेल्या अधिकाऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी या निवेदनात आहे. या निवेदनावर प्रा.राजू सोनसळे, राहुल चिखलीकर आणि रवि हडसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.