नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी एका मोकळ्या जागी मोटारसायकलच्या आडोशाला बसून 52 पत्यांच्या जुगारामधील झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना पाच जणांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती प्रेसनोटद्वारे दिली आहे. यामध्ये मात्र रोख रक्कम किती होती हे लिहिलेले नाही. याच शेजारी व्हाईट हाऊस जवळ सुरू असलेला जुगार अड्डा मात्र कोणाला दिसत नाही.
नांदेड ग्रामीणमधील पोलीस उपनिरिक्षक विश्र्वदिप रामचंद्र रोडे यांना पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या ठिकाणी पाठविले. ते ठिकाण म्हणजे माळटेकडी परिसरातील ओव्हरब्रिजजवळील अहमद फारुख यांच्या भुखंडासमोरील रस्त्यावर त्यानुसार 22 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता विश्र्वदिप रोडे, पोलीस अंमलदार संतोष जाधव, मारोती पचलिंग,सुनिल गटलेवार शंकर माळगे, स्थानिक गुन्हा शाखेतील विश्र्वनाथ पवार, प्रभाकर मलदौडे हे तेथे पोहचले. त्या ठिकाणी मोटारसायकलच्या आडोशाला बसून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पकडले. त्यात अब्दुल मुखीद अब्दुल मनान (31) रा.उस्मानिया गणी मस्जिदजवळ, मोहम्मदीया कॉलनी, देगलूरनाका नांदेड, अरशद खान परवेज खान (27) रा.तेहरानगर नांदेड, शेख आयान शेख राजीक (20) रा.गंगानगर टायरबोर्ड, नांदेड, शेख सोहेब शेख महेमुद(20) रा.मिल्लतनगर नांदेड, सय्यद रहिम सय्यद हबीब (36) रा.नेक्लेस रोड देगलूर नाका नांदेड यांचा समावेश आहे. ही माहिती देतांना प्रेसनोटप्रमाणे त्यांच्याकडून 1 लाख 29 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केेल्याचे लिहिले आहे. पण त्यात रोख रक्कम किती आहे हे मात्र नाही. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ही कार्यवाही करण्यात आली आहे. या संदर्भाने पाच जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 1171/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार माधव स्वामी हे करीत आहेत.
या जुगार अड्ड्याच्या जवळपासच व्हाईट हाऊसजवळच दुसरा एक मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पण गुप्त माहितीमध्ये त्या जुगार अड्ड्याची माहिती मात्र प्राप्त झालेली दिसत नाही.