नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात फक्त भिंत बदलून नियुक्ती मिळालेले आणि स्थानिक गुन्हा शाखेत काम करणाऱ्या एका पोलीस अंमलदाराने नांदेड ग्रामीण मधील पहिलवान पोलीस अंमलदारासोबत कोण्या तरी अधिकाऱ्याची वसुली करण्याचा ठेका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे.
स्थानिक गुन्हा शाखेत बरेच बदल झाले. बदल झाल्यानंतर काही जणांना स्थानिक गुन्हा शाखेची भिंतच सोडून नियुक्ती दिली पण ते काम मात्र स्थानिक गुन्हा शाखेचेच करतात. त्या अगोदर त्या शाखेत असणाऱ्या पोलीस अंमलदारांना स्थानिक गुन्हा शाखेत साधा प्रवेश पण नव्हता. स्थानिक गुन्हा शाखेतील बदलानंतर बऱ्याच जणांचे “बीट’ बदलण्यात आले. या बीटमध्ये काय-काय असते ते जाणून घेण्याइतपत बुध्दी आम्हाला नाही. पण “बीट’ बदलल्यामुळे जुन्या लोकांची वाताहत झाली. त्यामुळे आपला तोरा कायम राहावा म्हणून अनेक जण वेगवेगळ्या शक्कली लढवत होते.
यात भिंत बदललेल्या एका पोलीस अंमलदाराला यश आले. त्याने आपल्यासोबत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पहिलवान पोलीस अंमलदार सोबत घेवून कोणत्या तरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची वाळु वसुली सुरू केल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. मागील दहा वर्ष हेच काम करत यांचे जीवन उन्नतीकडे जात आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलातील इतर कोणत्याही पोलीस अंमलदाराला हे काम येत नसेल म्हणून बहुदा त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली असावी.