नांदेड(प्रतिनिधी)-चोरट्यांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीला टार्गेट करत चार प्रकार घडविले आहेत. ज्यामध्ये 6 लाख 17 हजार 566 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी गायब केला आहे.
बंदाघाटजवळ राहणारे रविंद्र गोपीचंद लालवाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20 डिसेंबरच्या सकाळी 9 ते 21 डिसेंबरच्या सकाळी 7 वाजेदरम्यान त्यांच्या घरातील कपाट फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिणे 2 लाख 26 हजार रुपयांचे आणि रोख रक्कम 90 हजार रुपये असा एकूण 3 लाख 16 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 620/2024 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस उपनिरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
बंदाघाटच्या शेजारीच असलेल्या दिलीपसिंघ कॉलनीमध्ये राहणाऱ्या ममता काशिरामजी मालवीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 20-21 डिसेंबरच्या रात्री कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे 1 लाख 96 हजार 566 रुपयांचे आणि रोख रक्कम 10 हजार असा एकूण 2 लाख 6 हजार 566 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 619/2024 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक किरवले अधिक तपास करीत आहेत.
दिलीपसिंघ कॉलनीमधीलच दुसरे रहिवासी घनशाम शंकरराव गोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच रात्री चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे 50 हजार रुपयांचे आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तुकाराम गोविंद पट्टेवाड यांच्या घरातून रोख रक्कम 5 हजार असा 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 623/2024 प्रमाणे दाखल केली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार राठोड हे करीत आहेत.
भागिरथाबाई महाजन देशटवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्या नांदेड बसस्थानकात रिठ्ठा गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवेश करत असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यात असलेले सोन्याचे मनीमंगळसुत्र, 40 हजार रुपये किंमतीचे चोरुन नेले आहे. वजिराबाद पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 621/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस अंमलदार मुपडे अधिक तपास करीत आहेत.