उत्तम वक्तृत्व व्यक्तिमत्वाला आकार देते-राम तरटे

_साने गुरुजी कथाकथन स्पर्धेत संचिता आष्टेकर प्रथम_

नांदेड -शालेय जीवनातील वक्तृत्व कलेचा विकास होण्यासाठी कथाकथन हे अत्यंत महत्त्वाचे माध्यम असते. साने गुरुजी कथा मालेतून अशा प्रतिभावान कथा कथन करणाऱ्या विद्यार्थ्यांची ओळख तयार होते. तसेच यामधून विद्यार्थ्यांच्या उत्तम वक्तृत्व शैलीचा विकास होतो आणि व्यक्तिमत्त्वालाही आकार येतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध कथाकथनकार राम तरटे यांनी केले. ते साने गुरुजी कथामाला हेलस आयोजित, नांदेड जिल्हा कथाकथन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

शहरातील प्रियदर्शनी विद्या संकुल येथे अत्यंत देखण्या आणि भव्य स्वरूपात जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणाधिकारी मनपा व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी पद्माकर कुलकर्णी, केंद्रप्रमुख व्यंकट गंदपवाड, प्रियदर्शिनीचे अध्यक्ष बालासाहेब माधसवाड, विलास कोळनूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अध्यक्ष म्हणून बोलताना व्यंकटेश चौधरी यांनी गेल्या वीस वर्षांपासून साने गुरुजी कथामालेचे काम सेवाभावी वृत्तीने करत असून, माझ्या निवृत्तीनंतरही साने गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढे चालवत राहील, मात्र कथामालेचे काम पुढे नेण्यासाठी पद्माकर कुलकर्णी आणि विलास कोळनूरकर यांची मोठी जबाबदारी आहे अशी भावना व्यक्त केली.

या स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातून एकूण साठ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामधून महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर येथील विद्यार्थिनी संचिता सुभाष आष्टेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक पद्मावती जाधव आणि तृतीय क्रमांक आलिशा शेख या मुलींनी प्राप्त केला. प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धा दिनांक 24 डिसेंबर रोजी साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त परभणी येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षण प्रवीण राऊत, रूपाली गोजवडकर, कविता जोशी यांनी केले. विजेत्या स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, श्यामची आई पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

प्रारंभी साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि ग्रंथ देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले. स्पर्धा संयोजनासाठी रूपेश गाडेवाड, अजित कदम, सचिन दिग्रसकर, गुंजा वाडीकर, संदीप भोरगे, वर्षा कंठे, खांडेश्वर बोंडले, गणेश इंगळे, संघमित्रा गायकवाड, अश्विनी पाटील, निरज डहाळे, भाग्यश्री गैनवार आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!