नांदेड(प्रतिनिधी)-15 डिसेंबर रोजी रात्रीच्यासुमारास सावरगाव तांड्याजवळ घडलेल्या एका खून प्रकरणाला नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणले असून दोन जणांना अटक केली आहे. पैसे देणे-घेण्याच्या वादावरून हा खुन झाला होता.
सावरगाव ता.किनवट येथे फर्निचरचे दुकान असणाऱ्या परमेश्र्वर मारोती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.15 डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळेस सावरगाव तांड्याजवळ, सार्वजिक रस्त्यावर अर्थात सावरगाव शिवारात सखाराम मारोती गायकवाड (40) यांचा खून झाला होता. त्या संदर्भाने ईस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 164/2024 दाखल होता. जिल्ह्यात कोठेही घडलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे अधिकार असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेने या प्रकरणात लक्ष घातले. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरिक्षक साईनाथ पुयड आणि आपल्या शाखेतील कर्मचाऱ्यांना या कामावर पाठविले. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 72 तासात सखाराम मारोती गायकवाडचा खुन करणाऱ्या समिर शिकुर शेख (25) व्यवसाय लाकडाचा व्यापार आणि विजय सुरेश पगारे(22) दोघे राहणार वडीगोदरी ता.आंबड जि.जालना यांना पकडले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अशी माहिती प्राप्त झाली की, त्यांच्यात आणि सखाराम गायकवाड यांच्यामध्ये पैसे देण-घेण्याच्या कारणावरुन वाद झाला होता आणि त्यातूनच शेतातून घरी येणाऱ्या सखाराम गायकवाडचा दगडाने शरीरावर अनेक जागी ठेचून त्या दोघांनी खुन केला होता. पकडलेल्या शेख समीर आणि विजय पगारेला पुढील तपासासाठी ईस्लापूर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले.
काही महिन्यापुर्वी पोलीस ठाणे माहुर हद्दीत एका 30 वर्षीय महिलेला जीवंत जाळून तिच्या खून करण्यात आला होता. पण त्या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचा अधिकार असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेला ते प्रकरण उघडकीस आणण्यामध्ये वृत्तलिहिपर्यंत तरी यश आलेले नाही.