नांदेड(प्रतिनिधी)-40 लाखांची लाच स्विकारण्याच्या प्रकरणात एका मुख्याध्यापकाने मागितलेली अटकपुर्व जामीन नांदेड येथील विशेष न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन काढण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. प्रलंबित वेतन जवळपास सव्वा कोटी रुपयांचे होते. त्यातील 40 टक्के असा लाचेचा हिस्सा ठरला होता. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बॅंकेत जमा झाल्याबरोबर लाचेचे 40 लाख रुपये द्यावे लागतील असे ठरले होते. त्यानुसार 22 नोव्हेंबर रोजी दुपारी पावणे तीन ते तीन या वेळेदरम्यान बॅंकेतून 40 लाखांची रक्कम काढून तक्रारदाराने शिवराज विश्र्वनाथ बामणे (40)(लिपीक- नेमणूक छत्रपती शाहु महाराज अपंग विद्यालय काबरानगर नांदेड), आणि चंपत आनंदराव वाडेकर (50)( लिपीक-नेमणूक कुंटूरकर निवासी दिव्यांग कार्यशाळा राजनगर नांदेड) या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.
शिवराज बामणे आणि चंपत वाडेकर यांना काही दिवसांची पोलीस कोठडी आणि काही दिवसात तुरूंगात राहिल्यानंतर न्यायालयाने जामीन दिला होता. या प्रकरणात वैभव निवासी शाळा, खानापूर ता.देगलूर येथील मुख्याध्यापक यादव मसनाजी सुर्यवंशी यांचेही नाव आरोपी या सदरात होते. त्यांनी नांदेड जिल्हा न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक 906/2024 दाखल करून त्यांच्याविरुध्द दाखल झालेला भाग्यनगर पोलीस ठाण्यातील भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाचा गुन्हा क्रमांक 590/2024 मध्ये अटकपुर्व जामीन मागितला होता.
या संदर्भाने न्यायालयात सादरीकरण करतांना जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. रणजित देशमुख यांनी सांगितले की, यादव सूर्यवंशी, शिवराज बामणे यांच्यासोबत झालेल्या बोलण्यामध्ये खरे तर 54 लाखांची लाच मागणी होती आणि त्यांच्यात झालेल्या बोलण्याचा अभिलेख उपलब्ध आहे. म्हणून त्यांची पोलीस कोठडीतील तपासणी आवश्यक आहे. या मुद्याला ग्राह्य मानून नांदेड येथील विशेष न्यायालयाने मुख्याध्यापक यादव सुर्यवंशी यांनी मागितलेला जामीन फेटाळला आहे.