नांदेड-गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत पात्रता फेरीसाठी झालेले चारही सामने तुल्यबळ झाले. या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, एलएनआयपी विद्यापीठ ग्वाल्हेर, के.डी. विद्यापीठ हनुमानगड व पारुल विद्यापीठ वडोदरा संघाने प्रतिस्पर्धावर मात करीत साखळी फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. यजमान नांदेड विद्यापीठ संघाला मात्र पराभवाची चव चाखावी लागली.
उपांत्यपूर्व पहिल्या सामन्यात वडोदऱ्याच्या पारुल विद्यापीठाने भारती विद्यापीठ पुण्याचा अटीतटीच्या लढतीत ३-२ असा प्राभाव केला. दुसऱ्या सामन्यात हनुमानगढच्या श्री. के.डी. विद्यापीठाने यजमान नांदेड विद्यापीठ संघाचा २५-१९, २५-१८, २६-२४ असा पराभव केला. तर गतविजेत्या एल.एन.आय.पी. विद्यापीठ ग्वाल्हेर संघाने अहमदाबादच्या लोकजागृती विद्यापीठाचा ३-१ असा उत्कंठावर्धक सामन्यात पराभव केला. चौथ्या सामन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाचा ३-२ असा पराभव करीत साखळी फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. तत्पूर्वी उपउपांत्यपूर्व सामन्यात पारुल विद्यापीठ वडोदऱ्याने राजस्थान विद्यापीठाचा ३-२ ने अटीतटीच्या सामन्यात पराभव केला. यजमान नांदेड विद्यापीठ संघाने अजमेरच्या महर्षी विद्यापीठाचा ३-१ ने पराभव केला. लोकजागृती विद्यापीठ अहमदाबादने पंडित दीनदयाल शिकर विद्यापीठाचा ३-० असा एकतर्फी पराभव केला.
आज ठरणार विजेता……. बाद फेरीतील सामने चुरशीचे झाले प्रत्येक विद्यापीठातील खेळाडूंनी विजयासाठी सर्वस्व पणाला लावले होते. विशेषता पात्रता फेरीचे सामने रंगतदार झाले. मंगळवारच्या सायंकाळच्या सत्रापासून साखळी सामन्यांना सुरुवात झाली असून बुधवारी साखळी सामन्यातूनच या स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. विजेत्या संघाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते बुधवार दि.१८ डिसेंबर रोजी सायंकाळी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू सीए डॉ. प्रवीण पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू विनोद नेमाणीवार, वरिष्ठ गटातील राष्ट्रीय खेळाडू सय्यद निसार तसेच विद्यापीठाचे प्र-कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, प्र. क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने यांची उपस्थिती राहणार आहे. साखळी स्पर्धेत प्रवेश मिळविलेले चारही संघ अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
या स्पर्धेसाठी पंचप्रमुख पी.एस. पंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे पंच, तसेच क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील, अंजली पाटील, डॉ. कैलास पाळणे, डॉ. विक्रम कुंटूरवार, राजकुमार दहीहंडे, सचिन पाळणे, नीरज उपलंचवार, डॉ. तातेराव केंद्रे, महेश पाळणे, डॉ. महेश बेबडे यांच्यासह पंच सौरभ रोकडे, केदार भाटे, विनय राहटे, कुंजल संख्ये, प्रणय पातरंगे, गुरुप्रितसिंघ, रवींद्र धोत्रे, रियाज शेख, कृपा बाविस्कर, शिवाजी क्षिरसागर, अजय वाघ, अशोक दीक्षित आदी परिश्रम घेत आहेत.