एकलव्य निवासी इंग्रजी शाळेसाठी  23 फेब्रुवारीला प्रवेश पूर्व परीक्षा  

नांदेड :- इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशाकरीता रविवार 23 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेचा लाभ सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात पाचवी, सहावी, सातवी व आठव्या वर्गात शिकत असणाऱ्या अनुसूचित आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्रीमती कावली मेघना यांनी केले आहे.

किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकासच्या प्रकल्प अधिकारी श्रीमती कावली मेघना यांच्या कार्यालयाने त्यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकामध्ये हे आवाहन करण्यात आले आहे. अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांच्या अधिनस्त असणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच शासनमान्य अनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिकणारी मुले या प्रवेश पूर्व परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट अंतर्गत सदर प्रवेश स्पर्धा परीक्षा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोधडी येथे होणार आहे. एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल सहस्त्रकुंड ता. किनवट यांच्याकडे यासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. पूर्ण भरलेले अर्ज 3 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुख्याध्यापक आश्रमशाळा बोधडी येथे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!