नांदेड(प्रतिनिधी)-शहरात कोणत्याही अफवेवर विश्र्वास न ठेवता पोलीसांशी संपर्क साधून आपली शंका दुर करून घ्या. जेणे करून आपले आणि समाजाचे नुकसान होणार नाही असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
आज दुपारी 12-1 वाजेच्यादरम्यान शहरात काही दुकाने बंद झाली. या संदर्भाची माहिती घेतल्यानंतर असे दिसले की, पक्कीचाळ-देगावचाळ भागात एका चार कु्रझर या चार चाकी गाडीवाल्यासोबत काही युवकांची बाचा-बाची झाली किंवा असा काही किरकोळ प्रकार झाला. त्यावरुन तेथे लहान मुलांनी आणि युवकांनी 3-4 गाड्यांवर दगडफेक केली. त्या दगडफेकीची माहिती प्रसारीत झाल्यावर दुकाने बंद झाली होती. ती दुकाने पुढे नंतर सुरू झाली. या घटनेनंतर जागो-जागी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उभे आहेत. तेंव्हा जनतेने कोणत्याही अफवांवर विश्र्वास न ठेवता आपले दररोजचे कामकाज नियमित पणे करावे असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
समाज माध्यमांवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण त्या बद्दल अद्याप पुर्ण स्पष्टता समोर आलेली नाही. परभणी येथील घटनेसंदर्भाने एमसीआरमधील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. त्याचे शवविच्छेदन इन कॅमेरा आणि विशेष डॉक्टरांकडून होणार आहे. त्या अहवालानंतर कोणाला काही वाटत असेल तर त्यांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे लोकशाही मार्गाचा अवलंब करून निषेध व्यक्त करू शकतात.
सध्याच्या परिस्थितीत नांदेडमध्ये शांतता आहे. कोणीही पोलीसांशी संपर्क साधू शकतो आणि यासाठी आपत्तीच्या परिस्थितीत क्रमांक 112 डायल करा. किंवा पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड येथे 02462-234720 या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.