नांदेड(प्रतिनिधी)- जुन्या भांडणाच्या कारणातून सहा जणांनी मिळूणन एका व्यक्तीला मारहाण केल्याचा प्रकार शक्तीनगर रस्ता सिडको येथे घडला आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीसांनी अटक केलेल्या चार जणांना 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गौरव दिपकसिंह गहेरवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेच्यासुमारास शक्तीनगर, त्यांच्या घराजवळ सिडको येथे मोनुसिंग बावरी, हरकलसिंग टाक, बच्चु महाराज, विशाल चितळे आणि इतर दोन सर्व रा.गोविंद कॉलनी सिडको यांनी हातात तलवारी घेवून गौरव गहेरवारला जुन्या भांडणाच्या कारणावरून तु इथला दादा झालास काय म्हणून शिवीगाळ करत त्याला जिवे मारण्यासाठी तलवारीने हल्ला केला. तरी त्याने तलवारीचा वार हुकवला. त्यावेळी सर्वांनी मिळून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि पुन्हा भेटलास तर तुझे तकडे करून नदीत फेकुन देवू अशी धमकी दिली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा क्रमांक 1134/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन गढवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
नांदेड ग्रामाीणचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी आणि त्यांच्या सहकारी पोलीसांनी मोनुसिंग बावरी, हरकलसिंग टाक, बच्चु महाराज आणि विशाल चितळे या चार जणांना अटक केली. आज प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने या चौघांना 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.