नांदेड(प्रतिनिधी)-दोन हायवा गाड्या ज्यांच्यामध्ये चोरलेली वाळू भरलेली होती आणि एक पोकलेन सोनखेड पोलीसांनी जप्त करून फक्त गाडी चालकांवर दोन गुन्हे दाखल केले आहेत. मुळात या गाड्यांचा मालक कोण याचाही शोध होणे आवश्यक आहे. कारण फाटका तुटका दंड लावून तहसील कार्यालय या गाड्या क्षणार्धात सोडून देते आणि पुन्हा वाळूची चोरी सुरू राहते. परिवहन विभाग अशा गाड्यांवर कोणतीच कार्यवाही करत नाही. त्यांच्याकडून सुध्दा या गाड्यांची तपासणी होवून त्यांचा विमा, प्रदुषण प्रमाणपत्र तपासण्याची आवश्यकता आहे.
सोनखेड येथे 6 डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग व्यंकट माने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 220/2024 भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात महसुल अधिनियमाची जोड आवश्यक होती. कारण गौण खनिज कायद्यानुसार सुर्यास्त ते सुर्योदय या वेळेत गौण खनिजाची वाहतुक होत नाही आणि या गाड्या 6 डिसेंबरच्या रात्री 8.30 वाजता पकडल्या आहेत. दगडगाव वायपॉईंटजवळ पोलीसांनी हायवा गाडी क्रमांक एम.एच.46 ए.एफ.8312 ला तपासले तेंव्हा त्यात चोरीची वाळू होती. या गाडीचा चालक मारोती लक्ष्मण चव्हाण (27) रा.हिराबोरी तांडा ता.लोहा हा आरोपी बनला आहे.
दुसऱ्या एका घटनेत सोनखेड बसस्थानकाजवळ 8 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्यासुमारास हायवा गाडी क्रमांक एम.एच.24 ए.यु.6031 ची तपासणी केली असता त्यात सुध्दा चोरीची 25 हजार रुपये किंमतीची वाळू भरलेली होती. याबाबत सोनखेडचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत नागोराव गिते यांनी दिलेल्या तक्रारीवरुन या गाडीचा चालक रमेश चंदू वाघमारे(49) रा.अंबेसांगवी ता.लोहा विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार गुन्हा क्रमांक 224/2024 दाखल करण्यात आला आहे. पकडलेल्या हायवा गाड्यांची किंमत 46 लाख रुपये आहे आणि दोन्ही प्रकरणातील वाळूंची किंमत 10 हजार रुपये आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक अश्र्विनी जगताप यांनी सोनखेड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गणपत गिते, विश्र्वनाथ हंबर्डे, सिध्दार्थ वाघमारे यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.